मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय; 14 वर्षांपासून तुटपुंजे मानधन, नऊ दिवसांपासून आमरण उपोषण

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम करणाऱ्या राज्यभरातील कंत्राटी कर्मचारी तब्बल 14 वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. इतक्या कमी पगारात संसाराचा गाडा हाकताना या कर्मचाऱ्यांची प्रचंड ओढाताण होत असून सातत्याने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्रालयाला वारंवार निवेदने देऊनही कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे कंत्राटी तत्त्वावर काम करणारे सहाय्यक स्थापत्य अभियंता रामदास बर्डे आझाद मैदानात गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावल्याचे चित्र आहे.

अधिवेशन काळात अजिबात कुठल्याही प्रकारची बोंबाबोंब करू नका, अशा शब्दांत निर्ढावलेल्या फडणवीस सरकारने कर्मचाऱ्यांना धमकी दिली आहे.

आऊटसोर्सिंगद्वारे आलेल्या कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक पगार दिला जात असल्याचा आरोप कंत्राटी कर्मचारी संघटनेने केला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना पीएफ तसेच प्रवास भत्ताही देण्यात येत नाही. कनिष्ठ अभियंत्यांना महिना 22 हजार रुपये तर शिपाई आणि चालकांना 7 हजार रुपये मिळतात. वरिष्ठ लिपिकांना फक्त12 हजार रुपये पगार दिला जातो. अनेक कर्मचारी कर्जबाजारी बनले आहेत, असे ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सागर कांबळे यांनी सांगितले.