Monsoon Session – गोडाऊन तपासल्यानंतरच व्यावसायिक परवानगी, ई-कॉमर्स कंपन्यांची मनमानी रोखणार

ई-कॉमर्स कंपन्यांचे पेव फुटले असून विविध कंपन्या खाण्यापिण्यापासून सर्व प्रकारच्या वस्तू, साहित्य ऑनलाइन पुरवत असतात, मात्र खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांच्या गोडाऊनमध्ये कमालीची अस्वच्छता असते. त्या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या गोडाऊनची तपासणी केल्यानंतर त्यांना व्यावसायिक परवानगी दिली जाईल तसेच तपासणीसाठी 2100 जणांची भरती करून मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे. खाद्यपदार्थ तसेच शालेय पोषण आहाराच्या तपासणीसाठी 27 मोबाईल लॅब सुरू केल्या जाणार आहेत तसेच अशा तक्रारीसाठी 24 तास टोल फ्री नंबर सुरू केला जाणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिली.

दोन परवाने निलंबित; 34 जणांना नोटिसा

ई-कॉमर्स कंपन्या असलेल्या झेप्टो, स्विगी, झोमॅटो यांच्यासह अशा कंपन्यांच्या गोदामांतून एकूण 43 तपासण्या करण्यात आल्या. झेप्टोच्या गोडाऊनमध्ये मुदत संपलेले खाद्यपदार्थ सापडले. याप्रकरणी झेप्टो तसेच आणखी एक आस्थापना अशा एकूण दोन आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. 5 आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर 42 पैकी 34 आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती झिरवाळ यांनी दिली. संदीप जोशी यांनी याबाबत लक्षवेधी मांडली होती. एकनाथ खडसे, सत्यजीत तांबे यांनीही प्रश्न उपस्थित केला.