भाषावाद हा जाणूनबुजून निर्माण केलेला वादंग; मी मराठी, माझी मातृभाषा अस्सल मराठी, अमोल पालेकर यांचे अनमोल बोल

मी मराठी, माझी मातृभाषा मराठी, आम्ही दोघे मराठी आहोत. करियरच्या सुरुवातीला मला अनेक जणांनी नाव बदलायचा सल्ला दिला. पण मी मान्य केलं नाही. भाषावाद हा जाणूनबुजून निर्माण केलेला वादंग आहे. मी आणि माझी पत्नी संध्या याचा विरोध करत आहोत, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी मांडले.

डेहराडून येथे झालेल्या हिंदी दैनिकाच्या कार्यक्रमात अमोल पालेकर यांनी मायमराठीविषयी गौरवोद्गार काढले. होय माझी मातृभाषा अस्सल मराठी आहे, असे म्हणत पालेकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. ते पुढे म्हणाले, आम्ही हिंदुस्थानी असल्याचे गर्वाने सांगतो. आपल्या देशात प्रत्येक नागरिकाच्या भाषेचा सन्मान केला जातो. याच सर्वसमावेशकतेचा आम्ही आदर करतो.

‘अमोल की अमानत’ या कार्यक्रमात अमोल पालेकर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींना उजाळा दिला. यामध्ये त्यांनी ‘गोलमाल’, ‘बातो बातो में’, ‘छोटी सी बात’, ‘चित्तचोर’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाबद्दल आणि त्यानंतर आलेल्या चढ-उतारांबद्दल त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. दिग्दर्शक म्हणून त्यांनी ‘पहेली’, ‘थोडा सा रोमँटिक हो जायें’ चित्रपटातील पडद्यामागील पैलूंवरही चर्चा केली. त्यांच्या ताकदींसोबतच त्यांनी त्यांच्या कमतरताही जाहीरपणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितल्या.