रवींद्र चव्हाण भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली आहे. भाजपचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक किरेन रिजिजू यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या बडय़ा नेत्यांच्या उपस्थितीत वरळीमध्ये झालेल्या भाजपच्या राज्य अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा करून तसे प्रमाणपत्र त्यांना दिले.

रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते 2007 मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2009 पासून ते सलग चारवेळा विधानसभेवर निवडून येत आहेत. 2014 मध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. 2022 मध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी होती. पालघर आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला आहे.