युरोपची भट्टी झाली, दक्षिण स्पेनमध्ये पारा 46 अंशांच्या पार

दक्षिण युरोप आणि ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट आहे. कडक तापमानाने अंगाची लाहीलाही होतेय. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये सोमवारी रेकॉर्ड तापमानाची नोंद झाली. दक्षिण स्पेनमध्ये पाऱ्याने 46 अंशांची कमाल पातळी गाठली आहे. इटली आणि फ्रान्समध्ये वाढते तापमान लक्षात घेता रेड अलर्ट जारी केला.

भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या देशांमध्ये फ्रान्स, पोर्तुगाल आणि स्पेनपासून तुर्कीपर्यंत उष्णतेची लाट पसरली आहे. फ्रान्सच्या 16 ठिकाणी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. युरोपीय हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत इतर देशांमध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

स्पेन, इटली, जर्मनी आणि ब्रिटनच्या काही भागांमध्ये उन्हाचा कडाका वाढला आहे. या आठवड्याच्या अखेरीस काही भागांत पावसाने दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत किमान बुधवारपर्यंत उच्चांकी तापमान राहण्याचा अंदाज आहे. तुर्कीमध्ये वाऱ्यामुळे लागलेल्या जंगलातील आगीमुळे इझमीरच्या डोगानबे प्रदेशातील काही घरांचे नुकसान झाले. इझमीरमधील विमानतळ तात्पुरते बंद करावे लागले. संभाव्य हानी टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी चार गावे रिकामी केली. दीड हजार लोकांना सुरक्षितस्थळी न्यावे लागले. ‘अति उष्णता आता दुर्मिळ घटना राहिलेली नाही, ती सामान्य झाली आहे,’ असे ट्विट संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी स्पेनमधील सेव्हिल येथून केले. सेव्हिल येथील सोमवारचे तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचले होते.