
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या ईएमयू लोकलचे महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी काम ठेकेदारांना देण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या कुटील कारस्थानाला कामगार संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. ठेकेदारांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्याच्या भूमिकेविरोधात शिवसेनेच्या रेल कामगार सेनेसह विविध कामगार संघटनांनी आक्रोश मोर्चा काढला.
लोकलचे अभियांत्रिकी काम ठेकेदारांच्या अप्रशिक्षित कामगारांकडून करुन घेण्याचे कारस्थान रेल्वे प्रशासनाने रचले आहे. वास्तविक, ईएमयूमधील प्रत्येक कामगार 35 वर्षांपासून कुशलतेने व प्रशिक्षणाच्या आधारे प्रामाणिकपणे सर्व कामे करीत आहे. त्यांच्या भरवशावर मुंबईकर लोकलने प्रवास करतात. ईएमयूमधील कामगार कमी मनुष्यबळात काम करण्यास तयार आहेत. असे असतानाही माटुंगा प्रशासन कोट्यवधी रुपयांचा ठेका ठेकेदारांना देण्यास आग्रही आहे. याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला.
कामगार संघटनांची एकजूट
कामगारांना डावलून ठेकेदारांच्या भल्याचा विचार करणाऱ्या रेल्वे प्रशासनाविरोधात सर्व कामगार संघटनांनी एकजूट दाखवली. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत, कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या मोर्चात रेल्वे कामगार संघटना, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, शिवसेनाप्रणीत रेल कामगार सेना, महाराष्ट्र नवनिर्माण रेल कामगार सेना, एआयएससीएसटी, एआयओबीसी, आरएमयू या संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे नेतृत्व दिनेश खंडाळे, परशुराम राणे, संदीप पाटील, तेजस धनराव, दिनेश सूर्यवंशी आदी पदाधिकाऱ्यांनी केले.