
नोकरी करायची म्हटल्यावर अनेक गोष्टी या सांभाळाव्या लागतात. सध्याच्या घडीला करिअरमधली चढाओढ ही वाढली आहे. करिअरची कसरत सांभाळण्यासाठी, आपण सध्या घरात कमी आणि ऑफिसमध्ये जास्त काळ वावरतो. असं म्हणतात की, आपलं ऑफिसमधील वर्तन कसं असतं यावरच अनेक गोष्टी अवलंबून असतात. यशाची शिखरं गाठायची असतील तर ऑफिसमधील वर्तनाकडे लक्ष देणे हे खूप महत्त्वाचे आहे.
बहुतांशी घरांमध्ये आजही एखाद्या धंद्यापेक्षा नोकरीला प्राधान्य दिले जाते. मुख्य म्हणजे नोकरी करणं म्हणजे महिन्याला घरात एक ठराविक रक्कम येणार म्हणूनच अनेकजण नोकरी करण्याला प्राधान्य देतात. त्यानंतर खरं दिव्य सुरु असतं ते नोकरी टिकवण्याचं. नोकरी टिकवणं हे सध्याच्या घडीला खूप कठीण होऊन बसलेलं आहे. अनेकजण ऑफिसमध्ये सुख-सुविधा नाही म्हणून रडत बसतात. पण तरीही तिथेच काम करतात. ही कसरत करताना एक लक्षात येतं की, बाहेरच्या जगात नोकरी शोधणं आणि ती मिळणं हे फार कठीण झालेलं आहे.
करिअर हे उदरनिर्वाहाचे साधन असल्यामुळे, काही कारणांमुळे मात्र ऑफिस वातावरणाचा किंवा प्रसंगी वरिष्ठांचा आपल्याला वैताग आलेला असतो. अनेकदा तर ऑफिसमधील नकारात्मकता हीच आपल्या असमाधानाची बाब असते. कितीही नाही म्हटलं तरी या सर्व गोष्टींचा आपल्या कामावर परीणाम होत असतो. हे संस्थेसाठी आणि आपल्या वैयक्तिक वाढीसाठी चांगलं नाही.
याच गोष्टींना समोर धरुन ऑफिसमध्ये आपण नेमकं कसं वागावं याला आता एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपण काम करतो त्याठिकाणी वातावरण सकस आणि पाॅझिटिव्ह असेल तर काम करायलाही हुरूप येतो.
ऑफिसमध्ये आपण कसे वागायला हवे?
आपला ऑफिस लूक हा कायम एलिगंट लूक असायला हवा. म्हणूनच ऑफिसला जाताना टापटीप राहायला हवे. स्वच्छ आणि टापटीप राहिल्यामुळे, आपल्याला काम करण्यासही उत्साह येतो. तसेच दिवसभर उत्तम काम करण्याची उर्जा आपल्याला मिळते.
ऑफिसमध्ये अनेकदा असे प्रसंग येतात. जिथे आपली चीडचीड होते. अशावेळी उगाचच त्रागा करुन घेण्यापेक्षा, नेमकं आपण कुठे चुकतोय हे पडताळून पाहायला हवं.
काम करणाऱ्या प्रत्येक माणसाकडून चुका या होत असतात. परंतु कोणत्याही चुकांमुळे पॅनिक न होता, गोंधळून न जाता परिस्थिती संयमाने हाताळणे गरजेची आहे. परिस्थिती कोणतीही असो, संयम बाळगून काम करणे हीच खरी हुशारी आहे.
कुणीतरी आपल्याला चुका दाखवल्या तर, त्या व्यक्तींचा किंवा सहकाऱ्याचा राग करण्यापेक्षा आपण ती चूक सुधारणं गरजेचं आहे. त्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा राग केल्यास गोंधळ घातला तर, ऑफिसमधील वातावरण बिघडू शकते. त्यामुळेच ऑफिसमध्ये काम करताना संयमी वृत्ती ही खूप गरजेची आहे.
कोणतंही ऑफिस असो ऑफिस म्हटले की, आपल्याला एकमेकांच्या अनेक गोष्टी खटकत असतात. अशा परिस्थितीमध्ये वाद घालण्यापेक्षा किंवा वाईट शब्दात समोरच्याला सुनावण्यापेक्षा रागावर कंट्रोल ठेवायला शिकायला हवे.
ऑफिसमध्ये सोबत काम करणाऱ्यांशी आपले कायम उत्तम संबंध असायला हवेत. किमान एकमेकांशी उत्तम संबंध असल्याने ऑफिसमधील वातावरण खेळीमेळीचे राहते.
सध्याच्या घडीला अनेक ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना एकत्र आणून विविध खेळ आणि चर्चा यांचे आयोजन केले जाते. यामुळे सहकाऱ्यांमधील एकमेकांशी असलेली हितसंबंध सुधारण्यास मदत होते. तसेच एकमेकांना समजून घेणेही सहजशक्य होते.
ऑफिसमध्ये कामा व्यतिरिक्त गप्पा सुद्धा होणे हे खूप गरजेचे आहे. जेणेकरून कामाच्या ठिकाणी निर्मळ वातावरण तयार होण्यास मदत होते. यामुळे कामाचा ताणही जाणवत नाही.