
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे चहासाठी थांबलेल्या वारकरी कुटुंबातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. ‘महिला आयोग झोपला काय? महाराष्ट्राच्या मुली सुरक्षित नाय…’ अशा घोषणा देत अलका टॉकीज चौक येथे आंदोलन करण्यात आले. प्रतीकात्मक पुतळ्याचे हात आणि पाय तोडत महिलांकडून निषेध करण्यात आला.
‘गुलाबो गँग’ संघटनेच्या या आंदोलनामध्ये मोठय़ा संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. पंढरपूरच्या वारीदरम्यान या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला असून, सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप ‘गुलाबो गँग’ने केला आहे. गुलाबो गँगने राज्य सरकारविरोधात बॅनरबाजी करीत अलका टॉकीज चौक येथे आंदोलन केले.
राष्ट्रीय महिला आयोग पुण्यात तरीही…
राष्ट्रीय महिला आयोग आज पुण्यात होता. अध्यक्ष विजया रहाटकर यांनी अर्जांवर सुनावणी घेतली. यावेळी राज्य आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर देखील उपस्थित होत्या. मात्र दौंड तालुक्यातील वारकरी कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार संदर्भात आयोगाकडून प्रतिक्रिया आलेली नाही.