क्रिकेटवारी – लढवय्या वृत्ती हवी!

>> संजय कऱ्हाडे

कसोटी सामने जिंकण्यासाठी लढवय्या वृत्ती आणि बाणा आवश्यक असतो. पहिल्या कसोटीप्रमाणेच गिल टॉस हरला आणि हिंदुस्थानी फलंदाजांना बेन स्टोक्सने आमंत्रण दिलं, मात्र शानदार ड्राईव्हज, बहारदार कट्स आणि खणखणीत पुल्स मारत फक्त 107 चेंडूंत 87 धावा करणारा यशस्वी जैसवाल आपलं सहावं शतक करण्यापासून आणि कारकीर्दीत 2000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यापासून दहा धावा चुकला. तिथेच काळजाचाही ठोका चुकला! राहुल आणि छान स्थिरावलेला करुण नायर बाद झाल्यानंतर यशस्वी अन् कर्णधार शुभमन गिलने तारू सांभाळलं होतं. पण बेन स्टोक्सने टाकलेल्या पाचव्या स्टम्पवरच्या चेंडूला स्क्वेअर कट मारण्याच्या नादात यशस्वी बाद झाला अन् सारंच मुसळ केरात गेलं.

गेल्या कसोटीत दोन्ही डावात शतक झळकावणारा पंत अर्ध्यावर पंगत सोडून उठला. पाठोपाठ नितीशकुमारही बाद झाला. आता गिल आणि जाडेजाला किमान 550 धावांचं लक्ष्य डोळय़ासमोर ठेवावं लागेल.

एजबॅस्टनची खेळपट्टी संथ आहे. चेंडू किंचितसा थांबून बॅटवर येतोय. फटकेबाजी करण्याचा मोह मात्र टाळणंच योग्य. म्हणूनच 550चा पल्ला गाठण्यासाठी संयम, लढवय्या वृत्ती आणि बाणा पणाला लागणार आहे. पाहूया, खालची फळी मजबूत करण्यासाठी संघात आलेले शिलेदार ही कठीण परीक्षा पास होतात की नाही.

यंदाच्या बारीला मुश्कीलच वाटतंय!

बुमरा! त्याच्याबद्दल झालेल्या चित्रविचित्र विधानांमुळे त्याची अन् त्याच्या चाहत्यांची मनःस्थिती मात्र अवघडली. तो तीनच कसोटी सामने खेळणार असं प्रथम म्हटलं गेलं. मग अनेक समीकरणं मांडून काथ्यापूट केल्यावर कप्तान गिल म्हणाला, तो ‘उपलब्ध’ आहे. जागतिक क्रीडा पत्रकार दिनाला साऱयाच जागतिक क्रीडा पत्रकारांची दांडी गुल झाली.

अखेर, आज बुमरा खेळलाच नाही! म्हणजे, गिल खोटं बोललं का? की गिलला तो संघात हवा असताना अन् ‘उपलब्ध’ असतानाही बुमरा खेळला नाही? की त्याने इंग्लंड संघाला आणि पत्रकारांना चकित करायचं घाटलं होतं? कोण चकित झालं पुणास ठाऊक! असो, बुमराबद्दल लवकरच सविस्तरपणे.