भातखरेदी घोटाळ्यातील आरोपी अजित पवारांच्या वॉशिंग मशीनमध्ये, वर्षभरापासून फरार हरीश दरोडाला वाजतगाजत घेतले पक्षात; पोलिसांसमोरच पक्षप्रवेशाचा सोहळा

गोरगरीबांच्या कोट्यवधींच्या धान्यात अफरातफर करून वर्षभरापासून फरार झालेला हरीश दरोडा अखेर अजित पवार गटात सामील झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील एका कार्यक्रमात हारतुरे घालून वाजतगाजत दरोडा याला पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध करूनही न सापडलेला दरोडा पोलिसांसमोरच अजित पवारांच्या वॉशिंग मशीनमध्ये ‘साफसुथरा’ झाल्याने शहापुरातील धान्य घोटाळ्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
शहापूर तालुक्यातील साकडबाव सहकारी सेवा सोसायटी अंतर्गत 2022-23 मध्ये 13 हजार 892.30
क्विंटल भातखरेदी करण्यात आली होती. हे धान्य वेहळोली गोदाम 1 व 2 तसेच बेडीसगाव येथील गोदामात जमा करण्यात आले होते. आदिवासी विकास महामंडळाच्या शहापूर उपप्रादेशिक विकास महामंडळाने हे धान्य शेतकऱ्यांकडून घेतले होते. केंद्रप्रमुख जयराम सोगीर व प्रतवारीकार अजय धस्ते यांनी या तिन्ही गोदामांतील 7 हजार 771.44 क्विंटल धान्य राईस मिल्सना भरडण्यासाठी दिले. त्यामुळे गोदामात 5 हजार 120.86 क्विंटल धान्य शिल्लक राहणे अपेक्षित होते. मात्र या गोदामांमध्ये धान्यच शिल्लक नसल्याचे निदर्शनास आले.

आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या
भातखरेदी घोटाळ्यातील मुख्य आरोपी हरीश दरोडा हा अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील अन्य आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असताना हरीश कागदोपत्री फरार दाखवण्यात आला. आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीतच हरीश दरोडा याला पक्षात घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अजित पवार उत्तर देणार का?
अर्थखात्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवार यांच्याकडेच असून सध्या सरकारची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशा अवस्थेत सरकारलाच उल्लू बनवून हरीश दरोडा याने कोट्यवधींचा घोटाळा केला. त्याच हरीश दरोडाला आपल्या पक्षात घेऊन नेमके काय साधले, असा सवाल शहापूरकरांनी केला असून अजित पवार यावर उत्तर देतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राजकीय दबावामुळेच पोलिसांचा कानाडोळा
घोटाळा उघडकीस आल्यानंतर याबाबत आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे यांनी किन्हवली पोलीस ठाण्यात 1 कोटी 60 लाख 99 हजार 258 रुपयांचा भातखरेदी झाल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार संजय पांढरे, जयराम सोगीर, विजय गांगुर्डे, अविनाश राठोड, समाधान नागरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली. मात्र राजकीय वरदहस्तामुळे धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी हरीश दरोडा याच्या मुसक्या आवळण्यात आल्या नव्हत्या. याचदरम्यान त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. परंतु जामीन अर्ज फेटाळताच तो वर्षभरापासून फरार होता. राजकीय दबावामुळेच पोलीस त्याच्यावर झडप घालत नव्हते अशी चर्चा सुरू आहे.