Vasai Churchgate Local – लोकलमध्ये पुन्हा राडा; आता तर पोलिसाचाच दात तोडला, एकाला अटक

लोकलमध्ये रोजच राडे होत असताना ट्रेनच्या दारात उभे राहून जागा अडवणाऱ्या टोळक्यांना जाब विचारणाऱ्या एका पोलिसालाच जबर मारहाण झाली आहे. वसईहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली आहे. या मारहाणीत पोलिसाचा एक दात तुटला असून या पोलिसांनी रेल्वे हेल्पलाइन कडे दोनदा मदत मागूनही त्याच्या मदतीला रेल्वे सुरक्षा दलाची कोणतीही कुमक धावून आली नाही. याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून चारजणां विरोधात वस‌ई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस ठाण्यात मारहाण झालेले पोलिस कर्मचारी शिपाई पदावर कार्यरत आहेत. सरकारी कामानिमित्ताने ते सोमवारी सकाळी पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी वसई स्थानकावरून फलाट क्रमांक 4 वरून चर्चगेटला जाणारी अप लोकल पकडली होती. त्यावेळी प्रवाशांचा एक ग्रुप दारात जागा अडवून उभा होता. सदर पोलीस साध्या कपड्यात होते. त्यावेळी तुम्ही दारात उभे राहून जागा का अडवता? असा जाब त्यांनी त्या टोळक्याला विचारला. त्यावेळी झालेल्या वादातून चार प्रवाशांनी त्या पोलीस शिपायाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा शर्ट फाटला आणि जबड्याला दुखापत होऊन एक दात तुटला.

पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, मी पोलीस आहे असे सांगूनही ते चौघे लाथाबुक्क्यांनी मारहाण करतच राहिले. नंतर अन्य प्रवाशांनी मध्यस्ती केल्यानंतर आपली सुटका झाल्याचे त्यांनी सांगितले .

भाईंदर ते मिरा रोड दरम्यान मारहाण

भाईंदर पासून मिरा रोड स्थानक येईपर्यंत हे प्रवासी मारहाण करत होते. त्यांनी मदतीसाठी रेल्वेच्या दोन्ही हेल्पलाईनवर फोन केला पण मदत मिळाली नाही, असा आरोप मारहाण झालेल्या पोलिसांनी केला आहे.

पूण्याहून परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्यांनी मारहाण करणाऱ्या प्रवाशाचा शोध घेण्याचे ठरवले. विरारहून येणाऱ्या प्रवाशांचे टोळके जागा अडवून इतर प्रवाशांना आत घेत नाही अशी माहिती त्यांना मिळाली. रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्यांनी वसई रेल्वे स्थानकात सापळा लावला. त्यातील एक प्रवासी वसई स्थानकात दिसला. त्याला पकडून वसई रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. त्याचे नाव केयुर गोसालिया (२४) असून तो वसईच्या साईनगर येथे राहतो. त्याने मारहाण करणाऱ्या आपल्या अन्य तीन सहकाऱ्यांची नावे सांगितली.

त्या चौघांविरोधात वसई रोड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण करणे आदींसाठी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७, ३ (५) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.