
नवापूर तालुक्यातील शेवगे येथे नेसू नदीवर पूलच नसल्याने स्मशानभूमीकडे जाण्यासाठी आदिवासी बांधवांचे प्रचंड हाल होत आहेत. गळ्यापर्यंतच्या पूरपाण्यातून मृतदेह खांद्यावरून न्यावा लागतो. जीव धोक्यात घालून नातेवाईकांना नदी ओलांडावी लागते. मात्र, याकडे असंवेदनशील प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. सरकार या मरणयातनांची दखल घेणार का, असा संतप्त सवाल आदिवासी बांधवांनी केला आहे.
शेवगे येथील वस्ती नेसू नदीच्या एका काठावर, तर स्मशानभूमी दुसऱया काठावर आहे. तेथे जाण्यासाठी पूल किंवा पर्यायी रस्ता नसल्याने भर पावसाळ्यात ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होते. या भागात सध्या पावसाचा कहर सुरू असून, नेसू नदीला पूर आलेला आहे. अशा परिस्थितीत अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना नदी ओलांडावी लागते.
येथील इमाबाई वसावे यांचे आज निधन झाले. त्यानंतर कुटुंबीय व नातेवाईकांना नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागला. नदीचे पाणी काही भागात अगदी गळ्यांपर्यंत पोहोचले होते, अशा परिस्थितीत मृतदेह खांद्यावरून घेऊन जाण्याची वेळ आली. पर्यायी मार्ग असता तर अशा यातना सोसाव्या लागल्या नसत्या. मात्र, वेळोवेळी लक्ष वेधूनही प्रशासनाने या गंभीर बाबीकडे पाठ फिरवली. विकासाचा गाजावाजा करणाऱया सरकारला अतिदुर्गम भागातील हालअपेष्टा, गोरगरीबांच्या वाटय़ाला आलेल्या यातना दिसत नाहीत का, असा संताप व्यक्त होत आहे.