
>> गुरुनाथ तेंडुलकर
भगवद्गीतेतील दुसऱया अध्यायातील एका महत्त्वाच्या विषयावर आपण चिंतन करत आहोत. स्थितप्रज्ञ…स्थिर बुद्धीचा मनुष्य.
मागील काही लेखांतून आपण ‘व्यसन म्हणजे काय?’ हे थोडक्यात पाहिलं. आज आपण माणसाला कोणत्याही प्रकारचं ‘व्यसन का जडतं?’ याचा थोडक्यात परामर्श घेऊया.
मानवी मेंदूतून अनेक प्रकारची संप्रेरके निर्माण होतात. त्यामध्ये आनंद देणारी चार प्रमुख संप्रेरकं (हॉर्मोन्स) आहेत. डोपामाईन, सेरेटोनिन, एन्डॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन. हार्वर्ड विद्यापिठाच्या संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, या चारही हॉर्मोन्सचा माणसाच्या सुखाशी खूप जवळचा संबंध आहे. म्हणूनच या चार हॉर्मोनना ‘हॅपी हॉर्मोन’ असंही म्हटलं जातं. त्यातील व्यसनांमागे जे हॉर्मोन कार्यरत असतं त्याचं नाव आहे डोपामाईन. अनेक व्यसनं अशी असतात की, ज्याचे दुष्परिणाम तत्काळ दिसून येत नाहीत.
अगदी काहीही न करता आळसात बसून राहण्याचंदेखील एक व्यसन लागतं. देवळात जाऊन तासन्तास भक्ती करण्याचंदेखील व्यसन लागतं. केवळ स्वतचा मोठेपणा दाखवण्यासाठी बेसुमार खर्च करणं हेदेखील एक व्यसनच. पण या व्यसनाची गंमत म्हणजे प्रत्येक व्यसनी माणूस सुरुवातीला म्हणतो की, मी फक्त थोडा वेळ गंमत म्हणून ही गोष्ट करतो. माझा स्वतवर कंट्रोल आहे, परंतु दुर्दैवाने तसं होत नाही. हा कंट्रोल कधी निसटतो आणि पाय घसरून आपण व्यसनाच्या दरीत कधी कोसळतो याचं भानही अनेकदा राहत नाही. फुगा फुटल्यानंतर जाणवतं की, एवढा फुगवायला नको होता.
म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणतात…
यततो हि अपि कौंतेय पुरुषस्य विपश्चित ।
इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मन ।।60।।
भावार्थ – हे कुंतीनंदन अर्जुना, रसबुद्धी शिल्लक राहिल्याने प्रयत्न करणाऱया विद्वान माणसांचीदेखील इंद्रिये त्याच्या बलवान मनाला हरण करतात.
सुटलेली व्यसनं पुनः पुन्हा का लागतात यामागचं हेच तर खरं कारण आहे. लेखाच्या आरंभी आपण शरीरात आनंद पसवणारे चार हॉर्मोन्स आणि त्यातूनही प्रामुख्याने डोपामाइनबद्दल थोडी चर्चा केली, पण ते डोपामाईन पुनः पुन्हा वाढण्यासाठी आणि त्यातून क्षणिक आनंद मिळवण्यासाठी केली जाणारी व्यसनी कृती याच्या कारणांवर खरा प्रकाश भगवद्गीतेतूनच टाकलाय असं मला वाटतं.
ज्या गोष्टींचं व्यसन लागू शकतं त्या बहुतेक सगळ्या गोष्टी सुरुवातीला अत्यंत आकर्षक असतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर दारूच्या दुकानात किंवा एखाद्या मोठय़ा हॉटेलमधे काऊंटरवर मांडून ठेवलेल्या दारूच्या बाटल्या बघा. शरीराला अपायकारक दारूच्या रंगीबेरंगी बाटल्या आकर्षक आणि सुंदर दिसतात, पण शरीराला पोषक असणारं दूध मात्र साध्या बाटल्यांतून किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीतून विकलं जातं.
फुटबॉल खेळण्यासाठी मैदानात उतरून मेहनत करावी लागते. धावावं लागतं, कोपरंढोपरं फोडून घ्यावी लागतात. अनेकदा खरचटतं, मुका मार बसतो, पण तोच व्हिडीओ गेम खेळताना किंवा चटक लावणाऱया रमी अॅपवर रमी खेळताना काहीच कष्ट करावे लागत नाहीत. तिथे मज्जाच वाटते.
सत्संगात चांगल्या गोष्टी सांगणारे संतसज्जन आणि आयुष्यात हितकर बदल घडवणारे गुरुजन अनेकदा ‘कंटाळवाणे’ आणि ‘बोअर’ वाटतात, पण दारूच्या पाटर्य़ा करणारे, पिकनिक काढणारे, गाडय़ा उडवणारे मित्र आपले हितचिंतक वाटतात.
पुस्तकं वाचताना झोप येते, पण रील्स बघताना मात्र माणसं रात्र रात्र जागतात.
एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत करताना ज्यांचा हात आखडतो तीच मंडळी हॉटेलमधल्या जेवणारे भरमसाट बिल भरताना धन्यता मानतात.
व्यसनात गुरफटल्यामुळे क्षणिक सुखासाठी दीर्घकालीन आनंदाचा बळी दिला जातो. ‘सारं कळूनही हे असं कां होतं?’ त्याचं कारणही भगवंतांनी या श्लोकांत सांगितलं आहे.
माणसाला एकदा एखाद्या सुखाची चटक लागली की, कितीही मनोनिग्रह केला तरी त्याची इंद्रियं त्याच्या मनाला पुनः पुन्हा त्या व्यसनांकडे ओढून नेतात. इथं भगवंतांनी श्लोकामध्ये ‘प्रमाथिनी’ असा शब्दप्रयोग केला आहे. प्रमाथिनी म्हणजे भडकवणारी, क्षोभवणारी, उत्तेजित करणारी, उद्दीपित करणारी. कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाची चटक ही अशीच असते.
वर्षानुवर्षे तप करणाऱया ऋषी विश्वामित्रासारख्या तपस्वीचा तपोभंग आकर्षक दिसणारी मेनका करू शकते. तिथे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या मनाचा निग्रह पुनः पुन्हा ढासळला आणि समजून उमजूनदेखील आपण पुनः पुन्हा त्याच त्याच व्यसनांकडे किंवा व्यक्तींकडे ओढलो गेलो तर त्यात नवल ते काय?
म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात…
देखें विषय हे तैसे। पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषें।
मग आकळिती स्पर्शे। इंद्रियांचेनी ।।
तिये संधी मन जाये। मग अभ्यासीं थोटावलें ठाये।
ऐसे बळकटपणा आहे। इंद्रियांचे।।
हे अस्संच होतं, अस्संच होत राहणार. चटक लागलेली इंद्रियं मनाला पुनः पुन्हा क्षणिक सुखाकडे ओढून नेणार. इंग्रजीत याला ‘टेस्टिंग द ब्लड‘ असा वाक्प्रचार वापरला जातो. रक्ताला चटावलेला वाघ पुनः पुन्हा शिकारीसाठी गावात शिरतो, अगदी तोच प्रकार इंद्रियांच्या बाबतीत होतो. आपण आपल्या नकळत पुनः पुन्हा त्याच त्याच व्यसनांत गुरफटत जातो.
तुम्ही विचाराल यावर उपाय नाही का?
आहे ना! भगवंतांनी पुढच्याच श्लोकांतून त्यावरचा उपायदेखील सांगितलाय. इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी काय काय केलं पाहिजे ते नीट समजावून सांगितलं आहे.