नीरव मोदीचा भाऊ निहालला अमेरिकेत अटक

पंजाब नॅशनल बँकेच्या सुमारे 13 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचा भाऊ निहाल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. ईडी आणि सीबीआयच्या विनंतीवरून 4 जुलै रोजी अमेरिकेच्या न्याय विभागाने अटकेची कारवाई केली.

नीरव मोदीला कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती लपवण्यासाठी मदत केल्याचा आरोप निहालवर ठेवण्यात आला आहे. तसेच पुरावे नष्ट करण्याचा ठपकादेखील त्याच्यावर ईडीने आरोपपत्रातून ठेवला आहे. 46 वर्षीय निहाल कोठडीत असून पीएमएलए कायद्याच्या कलम 3 अंतर्गत मनी लॉण्डरिंग तसेच आयपीसी कलम 120 ब आणि 201 अंतर्गत गुन्हेगारी कट रचण्याचा आरोप निहालवर करण्यात आला असून केंद्र सरकारच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनुसार निहाल मोदीला अखेर अटक करण्यात आली. अमेरिकेच्या अभियोक्ताने दाखल केलेल्या तक्रारीनुसार दोन मुख्य आरोपांच्या आधारे प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निहाल मोदी प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी 17 जुलै रोजी होणार आहे.