हिमाचल प्रदेशात पुन्हा ढगफुटी, 74 जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता; पाच पूल गेले वाहून

हिमाचल प्रदेशात मंडी येथे आज पुन्हा ढगफुटी झाली. चंबा-मंडी येथे पावसाने पाच पूल वाहून गेले. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत 74 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. ढगफुटीनंतर अचानक आलेल्या पुरामुळे झालेल्या मोठ्या विध्वंसातून हिमाचल प्रदेश सावरू शकलेले नाही. हवामान खात्याने पुन्हा जारी केलेल्या अलर्टमुळे लोक घाबरले आहेत.

पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान

हिमाचलमध्ये मान्सूनमुळे आतापर्यंत 74 जणांचा मृत्यू झाला आहे. 113 जण जखमी झाले आहेत, तर 37 जण अजूनही बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री राज्यात 700 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करत असले तरी, आपत्ती व्यवस्थापनाने 541 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आकडा दिला आहे. राज्यात 261 रस्ते बंद आहेत. 300 ट्रान्सफॉर्मर बंद आहेत. 281 पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

मंडीमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. तिथे 15 जणांचा मृत्यू झाला आहे, अनेक लोकांचा शोध सुरू आहे. मंडीमध्ये 176 रस्ते बंद आहेत. कुल्लूमध्ये 39, सिरमौरमध्ये 19, कांगडामध्ये 120 आणि शिमलामध्ये 6 रस्ते बंद आहेत. मंडीच्या सेराजमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी सैन्याला मैदानात उतरावे लागले.