
आयसीसीच्या वन डे क्रमवारीत वेस्ट इंडीजचे स्थान पुन्हा एकदा डगमगलेय. त्यामुळे त्यांच्यावर 2023 च्या आयसीसी वर्ल्ड कपसारखेच बाद होण्याचे संकट बळावलेय. आयसीसीच्या नव्या वनडे क्रमवारीत सलग दोनदा जगज्जेता ठरलेला विंडीजचा संघ दहाव्या क्रमांकावर घसरल्यामुळे त्यांना 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यासाठी पात्रता फेरीत आपला खेळ दाखवावा लागू शकतो. मात्र वर्ल्ड कपला अजून बराच काळ उरला असल्यामुळे विंडीजला पुन्हा अव्वल आठ संघांत स्थान मिळवता येऊ शकते.
सध्या बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू असून या मालिकेतील दुसरा सामना बांगलादेशने जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साझगी आहे. या विजयामुळे बांगलादेश एक स्थान वर म्हणजेच नवव्या क्रमांकावर पोहोचलीय तर विंडीज दहाव्या क्रमांकावर असल्याचा माहिती ‘विस्डेन’नी दिली आहे.
अव्वल आठ संघांना थेट प्रवेश
2027 मध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कपमध्ये एकूण 14 संघ खेळणार आहेत. यात यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांना थेट प्रवेश देण्यात आले आहे. मात्र तिसरा यजमान असलेल्या नामिबियाला वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीतून आपले स्थान निश्चित करावे लागणार आहे. यजमानांना वगळून 31 मार्च 2027 पर्यंत वन डे क्रमवारीत अव्वल आठ स्थानांवर असलेल्या संघांना वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळेल. अन्य चार संघांना 10 संघांच्या पात्रता फेरीतून वर्ल्ड कपचे द्वार उघडता येईल. विंडीजला पात्रता फेरी टाळण्यासाठी पुढील एकदिवसीय सामन्यात जोरदार कामगिरी करणे बंधनकारक असेल.
2023 च्या वर्ल्ड कपमध्येही त्यांना पात्रता फेरीत झगडावे लागले होते आणि त्यांना वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करता आला नव्हता. सलग दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या विंडीजला 1975 नंतर प्रथमच वर्ल्ड कपमध्ये खेळता आले नव्हते. ते दोन स्थानांच्या संघर्षात नेदरलॅण्ड्स आणि श्रीलंकेशी पराभूत झाले होते.