
<<< संजय कऱ्हाडे >>>
मला आठवतंय, एका पावसाळी संध्येला अथांग जनसागरासमोर अटलजी म्हणाले होते, ‘आसमान में बादल छाये हुए हैं, और जमीनपर आप.’ टाळ्या, आरोळ्या, शिट्ट्यांनी कान ठणकावून गेले होते. शनिवारी इंग्लंडची पडझड होत होती, हिंदुस्थानचा संघ विजयश्रीला कवेत घेत होता तेव्हा माझ्या मनात सारखं येत होतं, ‘आसमान में बादल छाये हुए हैं, और एजबॅस्टन की जमीनपर आकाश!’ आकाशदीपचा शनिवारचा पुकारा चकितभीत करणारा होता. बोलिंग क्रिझच्या कोपऱ्यातून त्याने टाकलेल्या चेंडूने आत न येता सरळ जाऊन रूटचे स्टंप खडकावले तेव्हा मला सर रिचर्ड हॅडलीचा भास झाला. कारण क्रिझच्या कोपऱ्यातून टाकलेला चेंडू बाहेर काढणं किंवा सरळ ठेवणं फक्त जादूगाराला जमू शकतं. सर रिचर्ड हॅडली असाच किमयागार गोलंदाज होता.
बॅझबॉल चॅम्पियन हॅरी ब्रूकलाही आकाशदीपने उल्लू बनवलं. दोन आऊटस्विंगर्स टाकल्यावर तिसरा चेंडू आत आणला – गाफील ब्रूक पायचीत. म्हणूनच शनिवारी एजबॅस्टनच्या जमिनीवर आकाशदीप राज्य गाजवताना पाहायला मिळाला. त्याने सामन्यात 10 विकेट मिळवण्याचा पराक्रम केला. सामन्यात विजय मिळवताना हिंदुस्थानी जलदगती गोलंदाजांनी तब्बल 18 विकेट घेतले हेही नसे थोडके!
हिंदुस्थानचा हा 336 धावांनी मिळवलेला विजय प्रामुख्याने कर्णधार गिल, मोहम्मद सिराज, आकाशदीप यांच्या नावे लिहिला जाईल. अर्थात, त्यांना साथ देणाऱ्या पंत, राहुल, जडेजासारख्यांना विसरता येणार नाहीच.
इथे कर्णधार गिलने दुसरा डाव थोडा उशिराने घोषित केला म्हणून किंचित फार टीका ऐकू आली. आता कप्तान म्हणून पहिला सामना त्याने जिंकला असल्याने ही गोष्ट विस्मरणात जाईल. तरीही लक्षात घ्या, माझ्या मते तो कोड्यात सापडला असावा. लवकर डाव घोषित केला आणि कमी धावांच्या आव्हानांवर बॅझबॉलची तलवार फिरली तर तिसऱ्या कसोटीत उतरताना 0-2, उशिराने डाव घोषित करण्याने सामना अनिर्णित राहिला तर 0-1 आणि भरपूर धावांचं आव्हान ठेवल्यानंतर गोलंदाजांनी कमाल केली तर 1-1 बरोबरी! या सामन्यातले शुभमनचे सारेच निर्णय योग्य, चेकमेट करणारे ठरले!
आता सुनील गावसकरांच्या वाढदिवशी म्हणजे 10 जुलैला तिसऱ्या कसोटीसाठी हिंदुस्थानचा संघ जसप्रीत बुमरासह मैदानावर अधिक विश्वासाने उतरेल. या सामन्यात आपल्याला बरेच धडे मिळालेत. त्यातून आपण शिकू आणि आपली घोडदौड कायम ठेवू एवढीच अपेक्षा!