जीडीपी 10 टक्क्यांनी वाढला तरच विकसित हिंदुस्थानचे लक्ष्य गाठू; तिसरी आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न दूरच; सीआयआयच्या अध्यक्षांचे मत

हिंदुस्थान लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा म्हटले आहे. तसेच 2047 पर्यंत हिंदुस्थानचे विकसित हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. परंतुहिंदुस्थानने वर्षाला सरासरी 10 टक्के जीडीपीचे उद्दिष्ट गाठले तरच हे स्वप्न पूर्ण होईल, असे सीआयआय अर्थात हिंदुस्थानी उद्योग महासंघाचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी म्हटले आहे

देशाला विकसित हिंदुस्थानचे लक्ष्य गाठण्यासाठी वर्षाला जवळपास 10 टक्के जीडीपीवाढीचे उद्दिष्ट समोर ठेवावे लागेल, असे मेमानी यांनी म्हटले आहे. वृत्तसंस्थेच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. हिंदुस्थान आणि अमेरिकेमधील अंतरिम व्यापार कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप मिळण्याची आशा आहे. हा करार झाला तरच हिंदुस्थानी उद्योगांवरील अनिश्चिततेचे ढग दूर होतील तसेच हिंदुस्थानी पंपन्यांना चांगले दिवस येतील आणि मोठय़ा बाजारपेठेत त्यांना शिरकाव करता येईल, असेही ते म्हणाले.

भूराजकीय अनिश्चिततेचे संकट घोंघावतेय

2025-26 या आर्थिक वर्षात हिंदुस्थानातील अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 6.6 ते 6.7 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. परंतु, भूराजकीय अनिश्चितता म्हणजेच शेजारील देश पाकिस्तान, चीन, बांगलादेश या देशांशी असलेले व्यापार आणि विविध स्तरांवरील संबंध यांमुळे एक नकारात्मक वातावरण बनल्याचेही दिसत आहे, असेही मेमानी यांनी नमूद केले

हिंदुस्थानअमेरिका व्यापार करारच तारू शकतो

गेल्या अनेक दिवसांपासून हिंदुस्थान आणि अमेरिकेतील व्यापार कराराची चर्चा सुरू आहे. मात्र, या करारावर चर्चाही सुरू झालेली नाही. दोन्ही देशांमधील करारच हिंदुस्थानच्या उद्योगाला तारू शकतो. या करारामुळे हिंदुस्थानातील विविध पंपन्या आणि उद्योगांसाठी अनेक रस्ते खुले होतील. संयुक्त उद्योगवाढील चालना मिळेल आणि दोन्ही देशांना एकमेकांचे तंत्रज्ञान समजून घेता येईल. त्याचा उद्योगवाढीसाठी वापर करता येईल, असेही मेमानी म्हणाले.