डेटिंग अ‍ॅप्सच्या नावाखाली फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

डेटिंग अ‍ॅप्सच्या नावाखाली फसवणूक करणाऱया आंतरराज्य टोळीच्या एमएचबी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी कारवाई करून 21 जणांना अटक केली. ही टोळी गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईतील एका हॉटेलमधून ऑनलाईन फसवणूक करत होती. त्यात पंधरा पुरुष आणि सहा तरुणींचा समावेश असून ते उत्तर प्रदेश आणि दिल्लीचे रहिवासी आहेत.

सांताक्रुझ येथे तक्रारदार राहतो. त्याची एका अ‍ॅपवरून तरुणीशी ओळख झाली होती. ओळखीनंतर तो तिला भेटण्यासाठी गेला. भेटीदरम्यान एका तरुणीने त्याला एका हॉटेलमध्ये बोलावले. जेवण आणि हुक्का मागवला. त्याचे बिल 35 हजार रुपये झाले. ते पैसे भरण्यास त्याने नकार दिला. बिल जास्त असल्याने त्याने पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

परिमंडळ-11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार याच्या पथकातील पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड, सहाय्यक निरीक्षक राजश्री पाटील, उपनिरीक्षक वसीम शेख, नीलेश पाटील आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांचे पथक नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये गेले. तेथून 21 जणांना ताब्यात घेतले. डेटिंग अॅप्सच्या नावाखाली तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाइल बनवले होते. त्या बनावट आयडीवरून ते तरुणांना विविध हॉटेलमध्ये बोलवत असायचे.