
26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा आता पोपटासारखा बोलू लागला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचसमोर तहव्वूर राणा याने अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीमध्ये झालेल्या चौकशी दरम्यान राणाने आपण पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होतो अशी कबुली दिली. तसेच आखाती युद्धा दरम्यान आपल्याला सौदी अरबमध्ये पाठवण्यात आल्याचेही त्याने सांगितले. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
एनआयए चौकशीदरम्यान तहव्वूर राणा याने आपण पाकिस्तानी सैन्याचे विश्वासू एजंट होतो अशी कबुली दिली. तसेच त्याने त्याचा मित्र डेव्हिड हेडली याच्यासोबत पाकिस्तानची दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाच्या अनेक ट्रेनिंग सेशमध्ये भाग घेतल्याचीही कबुली दिली. एवढेच नाही तर लश्कर-ए-तोएबा ही फक्त दहशतवादी संघटना नसून ती गुप्तहेर संघटनेसारखी काम करते, असा गौप्यस्फोटही राणाने केला.
मुंबईत इमिग्रेशन फर्मचे केंद्र उघडण्याची आपली योजना होती. 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी आपण मुंबईत उपस्थित होतो आणि या दहशतवादी कटामध्ये सहभागी होतो, अशीही कबुली तहव्वूर राणाने दिली. एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची आपण रेकीही केली होत. तसेच पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने हा हल्ला करण्यात आला होता, अशी कबुली राणाने दिली.
तहव्वूर राणा हा दहशतवादी डेव्हिड हेडलीचा जवळचा मित्र होता. तो देखील 26/11 हल्ल्यात सहभागी होता. चौकशी दरम्यान त्याने राणाच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यानंतर राणावर फास आवळण्यात आला. नुकतेच त्याचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आले होते.
दरम्यान, 26/11 हल्ल्यावेळी पाकिस्तानी दहशतवादी कसाबसह 10 दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसले होते. त्यांनी रेल्वे स्थानक, ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी हल्ले केले. यात 166 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता.