
डेंग्यूविरोधात लढण्यासाठी पहिली स्वदेशी लस तयार केली जात आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि हिंदुस्थानातील एक कंपनी डेंग्यूच्या लसीची निर्मिती करत आहे. सध्या लसीची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. ही ट्रायल पूर्ण होऊन लस तयार व्हायला आणखी दोन वर्षे लागतील. ही लस आल्यास डेंग्यूविरोधातील लढाईत हिंदुस्थानचे हे मोठे यश असेल.
डेंग्यू लसीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. अनेकांचे प्राण वाचणार आहेत. 2027 च्या अखेरीस ही लस ड्रग्ज रेग्युलेटर्सच्या मंजुरीसाठी पाठवली जाऊ शकते. त्यानंतर सामान्य लोकांसाठी लस उपलब्ध होईल. आरोग्य तज्ञ डॉ. समीर भाटी यांच्या माहितीनुसार, ही एक टेट्रा वेले वॅक्सिन असेल. डेंग्यूच्या चारही सिरोटाईप्सच्या विरोधात काम करेल. लस बाजारात आल्यानंतर डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत 80 ते 90 टक्के घट होईल.
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा लसीचा उद्देश आहे. जेणेकरून डेंग्यूचा प्रादुर्भाव गंभीर होऊ नये आणि लोकांचे प्राण वाचावे. तसं पाहिलं तर कोणतीही लस 100 टक्के सुरक्षेची गॅरेंटी देत नाही. मात्र रोगप्रतिकारशक्ती मजबूत झाल्याने धोका टळला जाऊ शकतो.
ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे. तिची निर्मिती आणि ट्रायल हिंदुस्थानात सुरू आहे. डेंग्यूच्या चारही सिरोटाईप्सच्या विरोधात ती प्रभावी ठरू शकते. जे आतापर्यंतचे मोठे आव्हान होते. लहान मुले, वृद्ध आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांच्यासाठी ही लस फायदेशीर असेल.