
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे व मतमोजणीचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज देण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. ही मागणी जनहित याचिकेद्वारे करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अॅड. मेहम्मूद प्राचा यांनी ही याचिका केली. न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. तुम्ही दिल्लीचे आहात. तसा तुमचा या निवडणुकीशी संबंध नाही. पण तुम्ही यासाठी जनहित याचिका करू शकता, अशी सूचना न्यायालयाने केली. ती अॅड. प्राचा यांनी मान्य केली.
सीसीटीव्ही, व्हिडीओ रेकॉर्डिंग जपून ठेवा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने आयोगाला द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
पंजाब व हरणायात सीसीटीव्ही फुटेज दिलेत
संपूर्ण निवडणुकीचे सीसीटीव्ही किंवा अन्य तपशील उमेदवाराने अथवा अन्य कोणी मागितल्यास तो आयोगाने द्यायला हवा. तसा नियम आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यातील निवडणूक अधिकाऱ्याकडे सीसीटीव्ही फुटेज देण्याची विनंती केली. मात्र हे सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले नाहीत. पंजाब व हरयाणा विधानसभा निवडणुकीचा तपशील देण्याची मागणी तेथील न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली होती. तेथील उच्च न्यायालयाने निवडणुकीचा तपशील देण्याचे आदेश आयोगाला दिले. मात्र महाराष्ट्रातील निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज दिले जात नाही. हे नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे न्यायालयानेच हे फुटेज देण्याचे आदेश आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.