
भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके यांनी मुलांसह आज विधान भवनावर धडक दिली. गेल्या एक वर्षापासून भेट मागूनही मुख्यमंत्री भेटत नाहीत आणि फुकेंसारख्या व्यक्तीला पाठीशी घालत आहेत, असा आरोप करत प्रिया यांनी निदर्शने केली. आक्रमक झालेल्या प्रिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
परिणय फुके यांचे भाऊ संकेत फुके यांच्याशी लग्न करताना फसवणूक झाल्याचा प्रिया यांचा आरोप आहे. संकेत यांचे किडनी प्रत्यारोपण झाले होते, पण त्याची माहिती लग्नापूर्वी दिली गेली नाही. ते आपल्याला समजल्यानंतर आपण फुके कुटुंबीयांना विचारणा केली असता त्यांनी जिवाला धोका होईल, अशी धमकी दिली. त्यानंतर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात येत आहे, असे प्रिया फुके यांचे म्हणणे आहे.
प्रिया फुके यांनी न्यायासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट दिली नाही. यामुळे संतप्त झालेल्या प्रिया यांनी आज विधान भवन गाठले. त्यांच्यासोबत त्यांची मुलेही होती. या वेळी प्रिया यांनी पर्समधून काही कागदपत्रे बाहेर काढून प्रसारमाध्यमांना दाखवण्याचा प्रयत्न केला असता महिला पोलिसांनी त्यांच्याकडून ती खेचून घेतली. त्यानंतर प्रिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि व्हॅनमध्ये बसवून घेऊन गेले.