भक्तिरसात मुंबईकर तल्लीन

आषाढी एकादशीचे औचित्य साधून ‘स्वरनिनाद फाऊंडेशन’ आणि ‘वीर सेनानी फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भक्तिरस – एक विठ्ठलमयी स्वरवंदना’ हा कार्यक्रम सादर झाला. स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली व पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे आणि त्यांच्या शिष्यवृंदांनी सुरांची आराधना सुरू केली, तेव्हा विठुमाऊलीच्या भक्तिरसात मुंबईकर तल्लीन झाले.

गजर ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या सामूहिक हरिपाठाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर संत सूरदास, मीराबाई, कबीर, तुकाराम, नामदेव, चोखोबा, ज्ञानेश्वर यांची भक्तिगीते रसिकांना आत्म्याच्या गाभ्याला भिडून गेली. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे ‘पत राखो’ (सूरदास), ‘अजपा जाप’ (कबीर), आणि डॉ. भरतजींचे ‘बोलावा विठ्ठल’ (तुकाराम), ‘हरी म्हणा’, ‘शिव के मन शरण हो’ या रचना मंत्रमुग्ध करणाऱया ठरल्या. मकरंद कुंडले (ऑर्गन), अमर ओक (बासरी), प्रसाद करंबेळकर (तबला), मंदार गोगटे (साइड रिदम), दादा परब (पखवाज) या संगीतकारांनी भक्तिरसाला श्रद्धेची तालबद्ध किनार दिली. सूत्रसंचालन अभिनेते विघ्नेश जोशी यांनी केले. या कार्यक्रमात वीर सैनिकांच्या कुटुंबांचा सन्मान करून त्यांना धनादेश देण्यात आला.