
‘देशातील सर्वच भाषा या राष्ट्रीय भाषा असून त्या-त्या ठिकाणच्या भाषेतच प्राथमिक शिक्षण दिले गेले पाहिजे,’ अशी भूमिका मांडत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राची हवाच काढून टाकली.
नव्या शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्राच्या आडून महाराष्ट्रात हिंदी लादण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केला. त्याविरोधात मोठा उठाव झाला आणि सरकारला माघार घ्यावी लागली. तामिळनाडू व कर्नाटकनेही त्रिभाषा सूत्राला विरोध केला. या पार्श्वभूमीवर हिंदी विरुद्ध इतर भाषा असा वाद देशात सुरू आहे. हिंदी रेटण्याच्या धोरणामागे आरएसएसच असल्याचा आरोपही होत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी भूमिका स्पष्ट केली.
‘देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषाच आहे अशी संघाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. लोक त्यांच्या त्यांच्या राज्यात स्वतःची भाषा बोलतात. त्याच भाषेत शिकतात, किंबहुना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच दिले गेले पाहिजे, असा स्थानिकांचा आग्रह असतो. त्यात गैर काहीच नाही. आमचेही तेच मत आहे आणि तशी व्यवस्थाही आहे,’ असे सुनील आंबेकर म्हणाले.