Air India Plane Crash – अहमदाबाद विमान अपघाताबाबत प्राथमिक अहवाल केंद्राकडे सादर, 260 जणांच्या मृत्यूचे गूढ उकलणार?

अहमदाबाद येथील एअर इंडिया विमानाच्या अपघाताबाबत तपास पथकाने प्राथमिक अहवाल नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर केला आहे. तपासकर्त्यांनी अहवालात नेमकं काय म्हटलंय याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) कडून या अपघाताची चौकशी केली जात आहे. एएआयबी संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार आढावा घेत आहे.

अहमदाबादहून लंडनला निघालेले एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळले. या अपघातात प्रवासी, क्रू मेंबर्ससह 260 जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघातानंतर केंद्र सरकारने तात्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानातून ब्लॅक बॉक्स क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) सुरक्षितपणे काढण्यात आला होता. त्यानंतर, 25 जून 2025 रोजी, एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या प्रयोगशाळेत ब्लॅक बॉक्सच्या मेमरी मॉड्यूलमधून डेटा यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला.

ब्लॅक बॉक्समध्ये उड्डाणाशी संबंधित तांत्रिक आणि संवादाचा संपूर्ण रेकॉर्ड असते. अपघाताची खरी कारणे शोधण्यासाठी हा रेकॉर्ड खूप महत्वाचा आहे. अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे झाला हे स्पष्ट करण्साठी तपास संस्थांना डेटाचे विश्लेषण करावे लागेल.