सामना अग्रलेख – कोण हा टिनपाट डुबे?

निशिकांत डुबेने केलेली महाराष्ट्राला आपटण्याची भाषा ही नरेंद्र मोदी, अमित शहांचीच आहे. महाराष्ट्राविरुद्ध गरळ ओकण्यासाठी मोदीशहांनी याडुबेचे थोबाड निवडले. ‘डुबेचे थोबाड हे गटार आहे. या गटारातून सर्वोच्च न्यायालय, पहलगामचे निरपराध बळी यांच्याबाबत सतत मैलाच बाहेर पडतो. या गटारास एकदा वरळीचे गटार दाखवावेच लागेल. राज्याराज्यांत, भाषाभाषांत भांडणे लावण्याची सुपारी आणि दलाली डुबेसारख्या लोकांनी घेतली असेल तर त्या सापळ्यात महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांनी अडकू नये. ‘डुबेचा निषेध मुंबई महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांनी करायलाच हवा.

देशात मोदी काळ सुरू झाल्यापासून भाजपमध्ये अनेक टुकार लोकांना भाव मिळू लागला. ‘पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार’ अशी स्थिती सर्वच क्षेत्रांत झाली आहे. निशिकांत दुबे या व्यक्तीच्या गळ्यातही असाच मणिहार आहे. हे महाशय भारतीय जनता पक्षाचे खासदार असून त्यांनी आता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर, मराठी माणसावर गरळ ओकली आहे. हे दुबे महाशय म्हणतात, ‘‘महाराष्ट्रात आता आहे काय? महाराष्ट्राचे वैभव संपले आहे. कोणता मोठा उद्योग महाराष्ट्रात आहे? आमच्या श्रीमंतीवर तुम्ही मराठी माणसे जगत आहात. महाराष्ट्राबाहेर आलात तर मराठी माणसांना आपटून आपटून मारू.’’ दुबेचे हे विधान महाराष्ट्राचा घोर अपमान करणारे आहे. मोदी-शहांच्या आशीर्वादाने हा दुबे अशी विधाने करतो व मोदींचे अभय असल्याने त्याला संरक्षण मिळते. ‘‘सर्वोच्च न्यायालयाला देशात अराजक माजवायचे आहे’’ असे वक्तव्य करून या माणसाने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला होता, पण मोदींचे अभय असल्याने तो तेथेदेखील सुटला. दुबे याचे बनावट ‘एमबीए’ डिग्रीचे प्रकरण धक्कादायक आहे. आपण एमबीए असल्याचे त्याने संसदेच्या प्रतिज्ञापत्रात दाखवले. ही डिग्री दिल्ली विद्यापीठाची असल्याचे त्याने शपथेवर सांगितले, पण ही डिग्री खोटी, बनावट असल्याचे स्वतः दिल्ली विद्यापीठानेच स्पष्ट केल्यावर या माणसाला अटक करून त्याची चौकशी होणे गरजेचे होते. संसदेची फसवणूक केल्याबद्दल या दुबेचे संसद सदस्यत्व रद्द व्हायला हवे होते, पण संसदेची इतकी भयंकर फसवणूक करूनही नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी दुबेचा बचाव केला. कारण स्वतः पंतप्रधान मोदी यांच्या सर्व ‘डिग्य्रा’ बोगस, बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे ‘गुरू तैसा चेला’ असा हा सगळा मामला आहे. पुन्हा हा ‘बोगस’ दुबे शिवरायांच्या महाराष्ट्रावर गरळ ओकत असताना मुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे नामर्द कॅबिनेट शेपूट घालून बसलेले दिसले. आपल्या अर्ध्या दाढीवरून हात फिरवत

दिल्लीश्वरांची गुलामी

त्करणारे फेकनाथ मिंधे व त्यांचे चाळीस चोरही दुबेच्या महाराष्ट्रासाठी अपमानजनक वक्तव्यानंतर बिळात लपले आहेत. या दुबेला त्याची जागा दाखवणारा, महाराष्ट्राचे पाणी दाखवणारा एकही मर्द माणूस भाजपच्या सरकारात, महाराष्ट्राच्या विधानसभेत नाही. जणू हे गांडूंचे राज्य गांडू लोकांसाठी चालवले जात आहे. कोण कुठला निशिकांत दुबे हा लोफर माणूस दिल्लीत बसून मराठी माणसाला अपमानित करतो आणि फडणवीसांचे कॅबिनेट षंढासारखे गप्प बसते. याचे रहस्य इतकेच की, या निशिकांत दुबेचे बोलवते धनी प्रत्यक्ष मोदी व शहा आहेत. त्यामुळे अर्ध्या दाढीवर हात फिरवणाऱ्यांची कढी पातळ झाली आहे. दुबे म्हणतो, ‘‘महाराष्ट्र कंगाल राज्य आहे.’’ या देशात कोण कंगाल पिंवा ‘बिमारू’ राज्ये आहेत व कोण कुणाच्या मेहेरबानीवर जगतोय ते सारा देश जाणतो. महाराष्ट्राने आपल्या श्रीमंतीचा ‘माज’ कधीच दाखवला नाही, पण महाराष्ट्राने कष्टातून मिळवलेल्या श्रीमंती आणि प्रगतीचा द्वेष मात्र अनेकांनी केला. महाराष्ट्राच्या संपत्तीवर दरोडे टाकण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. त्यातूनच मराठी माणसाला त्याच्या न्याय्य हक्कांपासून डावलण्याचे प्रकार झाले. मराठी माणूस जेव्हा त्याच्या हक्कांसाठी लढायला उतरतो तेव्हा इतर प्रांतांतील कावळे ‘काव काव’ करून मराठी माणसाला प्रांतीयवादी ठरवण्याचा प्रयत्न करतात. इतर सर्व प्रांतांनी आपापली भाषा, जमीनजुमला, अस्मिता यासाठी लढायचे, पण महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा आवाज उठवला की, कंगाल राज्यांचे कुणी टिनपाट ‘डुबे’ शिवरायांच्या राज्याविरुद्ध गरळ ओकतात. पुन्हा दुर्दैव हे की, ही गरळ सहन करणारे व त्या दुब्याविरोधात निषेधाचा ‘ब्र’ न काढणारे राज्यकर्ते महाराष्ट्राच्या गादीवर बसले आहेत. आज देशात जीएसटीच्या रूपाने सर्वाधिक ‘कर’ महाराष्ट्र देत आहे. सर्व हिंदी भाषिक राज्ये मिळून एकत्र केली तरी महाराष्ट्राच्या ‘जीएसटी’ कराचा जून 2025 चा आकडा (30 हजार 553 कोटी रुपये) त्यांच्यापेक्षा जास्त आहे. यातच कोण कोणाच्या मेहेरबानीवर जगतो त्याचा हिशेब स्पष्ट होतो. ब्रिटिशांना ‘चले जाव’ची धमकी देण्यासाठी महात्मा गांधी यांनी मुंबईचीच निवड का केली? याचा अभ्यास दुब्याठुब्यांनी करायला हवा.

भाजपचे नवे धर्मगुरू

श्यामाप्रसाद मुखर्जी हे बॅ. जीनांचे लांगूलचालन करीत होते तेव्हा महाराष्ट्र आणि मराठी माणूस पारतंत्र्याविरोधात लढत होता. मुंबईचा गिरणी कामगार ‘करो या मरो’च्या त्वेषाने रस्त्यावर उतरला होता. महाराष्ट्र दलालीच्या पाशात आणि मोहात अडकला नाही. तो सरस्वती आणि शौर्याचा पूजक आहे. हिमालयाच्या संरक्षणाचे कर्तव्य सह्याद्रीचेच असे मानणारा हा महाराष्ट्र व्यापारी वृत्तीने कधीच वागला नाही. त्यामुळेच महाराष्ट्राची नीतिमत्ता आजही मशालीसारखी धगधगत आहे. महाराष्ट्राने कधीच कुणाचा द्वेष केला नाही. जात, धर्म, प्रांत न पाहता भुकेल्याला अन्न, पाणी, निवारा दिला. कोरोना काळात उत्तर प्रदेशसह सर्वच राज्यांनी आपापल्या सीमा बंद करून आपल्याच लोकांना बाहेर ठेवले तेव्हा या सगळ्या हिंदी भाषिकांचा पालनहार महाराष्ट्रच होता. प्रयागराजच्या गंगेत हिंदी भाषिकांची प्रेते अनौरस म्हणून फेकली जात होती तेव्हा महाराष्ट्रात या सगळ्यांची ममतेने काळजी घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच होते. तेव्हा हा ‘डुबे’ कोठे होता? हाच तो ‘डुबे’ जो पहलगाम हल्ल्यात 26 महिलांचे कुंपू पुसल्यावर कश्मीरात जाऊन ‘दारूबाज’ पार्टी पोलीस संरक्षणात करीत होता. भारतीय महिलांच्या कुंकवाचे रक्षण करण्यासाठी पहलगामला एकही पोलीस नव्हता, पण ‘डुबे’च्या भव्य दारू पार्टीच्या संरक्षणासाठी मोदी-शहांनी शेकडो पोलीस ठेवले होते. असा हा ‘डुबे’ महाराष्ट्राला आपटून मारण्याची भाषा करतो हा विनोद म्हणावा लागेल. निशिकांत डुबेने केलेली महाराष्ट्राला आपटण्याची भाषा ही नरेंद्र मोदी, अमित शहांचीच आहे. महाराष्ट्राविरुद्ध गरळ ओकण्यासाठी मोदी-शहांनी या ‘डुबे’चे थोबाड निवडले. ‘डुबे’चे थोबाड हे गटार आहे. या गटारातून सर्वोच्च न्यायालय, पहलगामचे निरपराध बळी यांच्याबाबतही सतत मैलाच बाहेर पडतो. या गटारास एकदा वरळीचे गटार दाखवावेच लागेल. राज्याराज्यांत, भाषाभाषांत भांडणे लावण्याची सुपारी आणि दलाली ‘डुबे’सारख्या लोकांनी घेतली असेल तर त्या सापळ्यात महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांनी अडकू नये. ‘डुबे’चा निषेध मुंबई व महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांनी करायलाच हवा.