
शेतकरी, कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या मोदी सरकारच्या उद्योगपती धार्जिण्या धोरणांविरोधात देशातील कामगार एकवटले आहेत. देशातील दहा कामगार संघटनांच्या आघाडीने उद्या, 9 जुलै रोजी हिंदुस्थान बंदची हाक दिली आहे. बँका, विमा व टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांसह सुमारे 25 कोटी कामगार यात सहभागी होणार असून देशभर निदर्शने करणार आहेत. त्यामुळे सरकारी कामकाज ठप्प होणार आहे.
कामगार संघटनांच्या संयुक्त आघाडीने यासंदर्भात निवेदन काढले आहे. त्यानुसार हा बंद 100 टक्के यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यासाठी संघटित व असंघटित अशा सर्वच क्षेत्रांतील कामगार संघटनांनी जय्यत तयारी केली आहे. देशाच्या ग्रामीण भागातील कामगार व शेतकरी हेदेखील बंदमध्ये सहभागी होऊन ठिकठिकाणी निदर्शने करतील, अशी माहिती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अमरजीत कौर यांनी दिली. शाळा, महाविद्यालये व खासगी कार्यालये सुरू राहणार आहेत.
हे बंद राहणार
बँका, टपाल कार्यालय, कोळसा खाणी व कारखाने, राज्य परिवहन सेवा, सरकारी कंपन्या व विभाग, विमा कंपन्या, महामार्ग व रस्ते बांधकाम विभाग
रेल्वेलाही फटका बसणार
उद्याच्या बंदमध्ये रेल्वे कर्मचारी सहभागी होणार की नाही याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीत, मात्र निदर्शने व आंदोलनामुळे रेल्वे गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.






























































