
मोठय़ा त्यागातून देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर जात-पात बाजूला सारून कार्य करण्याची आवश्यकता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असलेल्या देशात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर काम करायला मिळणे ही अभिमानाची बाब आहे. एका संवैधानिक पदावर काम करणे म्हणजे घटनेवर काम करणे अभिप्रेत असते, कारण रक्तहीन क्रांती करण्याची ताकद संविधानात आहे, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज केले.
महाराष्ट्राचे भूमिपुत्र सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज राज्याच्या विधिमंडळ सभागृहात हृद्य सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. विधिमंडळात सत्कार होणे म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व जनतेकडून हा सत्कार आहे. मी नेहमीच स्वतःला राज्यघटनेचा विद्यार्थी समजत आलो आहे. दहावीमध्ये असताना माझ्यात राज्यघटना रुजली. माझे वडील रा. सु. गवई यांचे विधिमंडळात 30 वर्षांपेक्षा जास्त वर्षे प्रेमाचे नाते राहिले आहे, त्या विधिमंडळात माझा सत्कार हा न भुतो न भविष्यति असा क्षण आहे, असे म्हणत या सत्कार सोहळ्याबद्दल गवई यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सरन्यायाधीशांनी राज्यघटनेचे महत्त्व आणि ताकद यावेळी समजावून सांगितली. नागरिकांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठीच राज्यघटना आहे. राज्यघटनेमध्ये योग्य सुधारणा करण्याची मुभा घटना समितीने दिली आहे, असेही गवई यांनी सांगितले.
राज्यघटनेचे तीन स्तंभ आहेत, विधिपालिका, न्यायपालिका आणि कायदेपालिका. राज्यघटनेनुसार कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी विधीपालिकेची आहे, न्याय व्यवस्था स्वतंत्र असावी, दबाव तंत्रात नसावी ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर यांची होती. स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर जातीभेद बाजूला ठेवून काम करावे लागेल. बाबासाहेब आंबेडकर यांचेही मत असेच होते, असे गवई म्हणाले. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, पेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे विधिमंडळ पक्षनेते, गटनेते, मुख्य प्रतोद यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या भाषणाला प्रारंभ ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या गीताच्या ओळींनी केली. शेवट ‘मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा’ या ओळींनी केला. यावेळी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले.