मोर्चाला परवानगी नाकारूनही हजारो मराठी माणसांचा रस्त्यावर रुद्रावतार; मीरा रोडमध्ये पोलिसांची दडपशाही

मराठी माणसाला डिवचण्यासाठी मीरा-भाईंदरमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला मराठी जनतेने आज जोरदार उत्तर दिले. मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणसांचा प्रचंड मोर्चा निघाला. हा मोर्चा निघू नये यासाठी सरकारच्या दबावाखाली असलेल्या पोलिसांनी प्रचंड दडपशाही केली. मध्यरात्रीच नोटिसा काढल्या, शिवसैनिक आणि मनसैनिकांची धरपकड केली, मोर्चाला परवानगी नाकारली. मात्र तरीही मराठी माणसांचे मोहोळ घोंगावले. पोलिसांनी रोखल्यानंतर या मोर्चाने अक्षरशः रुद्रावतार धारण केला. दडपशाही करायला हे पाकिस्तान आहे काय, असा सवाल करत मोर्चेकऱ्यांनी हटणार नाही, असा इशाराच दिला. त्यानंतर सरकारची तंतरली आणि दोन तासांनी मोर्चाला परवानगी मिळाली. तब्बल पाच तास चाललेल्या या मोर्चात मराठीचा जबरदस्त एल्गार घुमला. या मोर्चाने महाराष्ट्रद्वेष्टय़ा महायुती सरकारच्या मुजोरीला मराठी माणसांनी जबरदस्त हादरा दिला.

‘मुझे मराठी आती नही… नही बोलूंगा… मुंबई, महाराष्ट्र की भाषा मराठी नही. यहाँ सब भाषा चलती है…’ अशी मग्रुरी करणाऱ्या मीरा-भाईंदरमधील एका परप्रांतीय दुकानदाराला कार्यकर्त्यांनी कानफटवले. त्यानंतर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यापाऱ्यांना उचकवून त्यांना मराठी माणसांविरोधात मोर्चा काढायला लावला. त्यावर मीरा-भाईंदरमध्ये मराठीवर अन्याय होत असेल तर तो खपवून घेणार नाही, असा इशारा देत महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चाची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर सर्वच पक्षीय नेते, कार्यकर्ते आणि मराठी माणसांनी एकीची वज्रमूठ आवळली.

हा मोर्चा निघू नये यासाठी सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावाखाली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीपासूनच दडपशाही सुरू केली. कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या. त्यांना झोपेतून उठवून त्यांची धरपकड करण्यात आली. ही बाब सर्वत्र कळताच मराठी माणसात प्रक्षोभ उसळला. सकाळी दहा वाजताच हजारोंच्या संख्येने मराठी माणसे मीरा रोडच्या शांती पार्क परिसरातील हॉटेल बालाजीजवळ गोळा होऊ लागली. त्याच वेळी तैनात असलेल्या पोलिसांच्या फौजफाटय़ाने शिवसैनिक आणि मनसैनिकांसह दीड हजार तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस व्हॅनमध्ये कोंबले. मात्र मराठी मोर्चेकऱ्यांचा रोष पाहून सरकारी पातळीवर चर्चा झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

 म्हणे घोडबंदरला मोर्चा काढा!

मराठी माणसांचा हा मोर्चा विराट होणार याची कुणकुण लागलेल्या सरकारने या मोर्चालाच परवानगी नाकारली. मोर्चा मीरा-भाईंदरमध्ये नको तर तो घोडबंदर रोडवर काढा, असा फतवा पोलिसांनी काढला. परप्रांतीय व्यापाऱ्यांचा मोर्चा विनापरवानगी मीरा-भाईंदरमध्ये निघतो, मग मराठी माणसांनी परवानगी मागूनही ती का नाकारता? मराठी माणसांची गळचेपी का करता? घटना मीरा-भाईंदरमध्ये घडली मग मराठी माणसांनी घोडबंदर रोडवर जाऊन मोर्चा का काढायचा, असा संतप्त सवाल मोर्चेकऱ्यांनी केला.

कार्यकर्त्यांची धरपकड,हॉलमध्ये डांबून ठेवले

पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता मराठी माणसांचा मोर्चा पुढे सरकू लागला तेव्हा पोलिसांनी तो अडवण्याचा प्रयत्न केला. या मोर्चाला येणाऱ्या शेकडो लोकांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेऊन एका हॉलमध्ये डांबून ठेवले. मात्र मोर्चेकऱ्यांची संख्या वाढू लागल्याने पोलीसही हतबल झाले.

मराठीसाठी पन्नास वेळा तुरुंगात जाईन – गोवर्धन देशमुख

मराठीवरचा अन्याय सहन करणार नाही म्हणजे नाहीच. मराठीसाठी  एकदा नव्हे तर पन्नास वेळा तुरुंगात जावे लागले तरी जाईन, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिला. मराठी भाषेचा आदर हा सर्वांना करावाच लागेल, पण महाराष्ट्राचे पोलीसच असे वागत असतील तर त्यामागे कोण आहे हे सर्वांना कळले आहे, असे ते म्हणाले.

भाजपचा नरेंद्र मेहता आगलाव्या – अविनाश जाधव

भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे आगलावे आहेत. ही आग मेहता यांनीच त्यांच्या राजकीय फायद्यासाठी लावली आहे, असे मनसेचे अविनाश जाधव यांनी सांगितले. मराठीसाठी सर्व बांधव एकवटले आणि मोर्चा यशस्वी झाला. जेव्हा जेव्हा मराठीवर अन्याय होईल तेव्हा तेव्हा मराठी बांधव एकजूट दाखवून देतील, असेही ते म्हणाले. मोर्चाआधी पहाटे साडेतीन वाजता जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

पोलिसांना घोडा खुपला

मोर्चात बाल शिवाजीच्या वेशातील चिमुकला ज्या घोडय़ावर बसून आला, तो घोडा पोलिसांना खुपला. पोलिसांनी तो घोडा अडवला, आणि तो तात्काळ तिथून घेऊन जाण्यास सांगितले.. तुम्हाला सवलत देतोय तर जास्त फायदा घेता का अशी दमदाटी पोलिसांनी केली. इथे जर कोणी थांबले तर बस मध्ये कोंडून बसावे लागेल अशा धमक्याही पोलिसांनी दिल्या.

सरकार झुकले; दोन तासांनी मोर्चाला परवानगी

मराठी माणसांच्या रुद्रावतारापुढे सरकारही झुकले आणि पोलिसांनी तब्बल दोन तासांनी या मोर्चाला परवानगी दिली. हा मोर्चा भाईंदर रेल्वे स्टेशनजवळ धडकला तेव्हा त्याचे रूपांतर भव्य सभेत झाले. या सभेत  मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, उपनेते विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, मनसेचे नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, एकीकरण समितीचे संदीप राणे, मनोज मयेकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.

मुस्लिम महिलेने नितेश राणे यांना सुनावले

या मोर्चात एका मुस्लीम महिलेने भाजपचे मंत्री नितेश राणे यांना सुनावले माझ्या रक्तात मराठी आणि माझ्या मनात महाराष्ट्र आहे असे सांगत या महिलेने राणे यांना तडाखेबंद उत्तर दिले. नितेश राणे म्हणतात, दाढी आणि गोल टोपी वाल्यांना मराठी येत नाही तर त्यांना मी उत्तर देतेय… त्याच समाजामधून मी आली आहे आणि आज मी तुम्हाला स्पष्ट आणि स्वच्छ मराठीत उत्तर देतेय. माझ्या रक्तात मराठी आहे, माझ्या ओठांवर मराठी आहे. आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रचंड प्रेम आहे… जाणीवपूर्वक समाजात भ्रम निर्माण करायचा हाच या भाजपवाल्यांचा अजेंडा आहे… हा मोर्चा मराठीसाठी आहे. मराठी विरुद्ध अमराठी असा नाही… महाराष्ट्र विरुद्ध इतर प्रांतवाले असाही नाही… याला जाणूनबुजून या राजकारणी भाजपवाल्यांनी त्यांच्या पोळ्या भाजण्यासाठी राजकीय रंग दिला आहे, असे खडेबोल महिलेने सुनावले.

शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

मीरा-भाईंदर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठय़ा संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी दडपशाही करून त्यांना ताब्यात घेतले आणि एका बसमध्ये बसवून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्याची तयारी करण्यात आली. यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’  अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

प्रताप सरनाईकांना चपलेने मारायला हवे होत – राजन विचारे 

चमकोगिरी करणाऱ्या प्रताप सरनाईकांना मोर्चेकऱ्यांनी पळवून लावले. पण त्यांना चपलेने मारायला हवे होते, असा संताप राजन विचारे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, तुम्हाला लाज वाटायला हवी. एकीकडे पोलिसांना सांगता मोर्चा रद्द करा. मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांना आदेश देता आणि इकडे येऊन मोर्चाला सामोरे जाण्याची नाटके करता. 50 खोके घेऊन सत्तेत बसलात ना मग आधी राजीनामा द्या असे खडेबोलही विचारे यांनी सरनाईकांना सुनावले. ही सगळी भाजपा आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांची मिलीभगत आहे. त्यांनी मराठी माणसाला जाणूनबुजून डिवचले आहे, असेही विचारे म्हणाले.