
एकीकडे महाराष्ट्रासह विविध राज्यांत त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली मोदी सरकार पहिलीपासूनच मुलांना हिंदी शिकवायला निघालेय… पण, दुसरीकडे शिक्षण मंत्रालयाच्या सर्वेक्षणातूनच अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तिसरी आणि सहावीच्या वर्गातील 50 टक्के विद्यार्थ्यांना 10 पर्यंतचे पाढे म्हणता येत नसल्याचे, तर नववीचे विद्यार्थीही गणितात अत्यंत कच्चे असल्याचे समोर आले आहे.
‘परख’ या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेने गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी सरकारी आणि खासगी शाळांमधील तिसरी, सहावी व 9 वीच्या तब्बल 21 लाख 15 हजार 22 विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. 50 टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देता आली, अशी कबुली शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीच दिली. यावरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याची गरज व्यक्त होत आहे.
तिसरीची मुले गणितात ‘ढ’
सराकीर शाळांमधील तिसरीच्या वर्गातील विद्यार्थी गणितात ‘ढ’ असल्याचे समोर आले. त्यांनी गणितात अतिशय कमी गुण मिळवले. त्यांना प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. तर अनुदानित सरकारी शाळांतील सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांनीही गणितात अतिशय सुमार कामगिरी केली.
तिसरीतील 55 टक्के विद्यार्थीच हुशार
तिसरीच्या वर्गातील केवळ 55 टक्के विद्यार्थ्यांना 99 पर्यंतचे क्रमांक चढत्या किंवा उतरत्या क्रमांकाने सांगता आले. तर 58 टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येची बेरीज आणि वजाबाकी करता आल्याचे समोर आले आहे. तर सहावीच्या वर्गातील केवळ 53 टक्के विद्यार्थ्यांना अंकगणित समजते. त्यांना 10 पर्यंतच्या पाढ्यांच्या माध्यमातून बेरीज आणि गुणाकार करता आला.
गणितात 46, तर भाषेत 57 टक्के गुण
सहावीतील विद्यार्थ्यांना ‘द वर्ल्ड अराऊंड अस’ या अतिरिक्त विषयाबद्दलही विचारण्यात आले. यात पर्यावरण आणि समाज यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना या विषयात केवळ 49 टक्के गुण मिळाले.