
बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली असून आदिवासी पाडे आणि आजूबाजूच्या रहिवाशांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी बोरिवली राष्ट्रीय उद्यानाला चारही बाजूंनी सिमेंटची बंदिस्त भिंत घालण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर बिबट्यांवर पाळत ठेवण्यासाठी उद्यानात अंतर्गत रस्ता बनवण्यात येणार असून त्यावर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात येणार आहेत, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
बोरिवली येथील बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यांची संख्या 54 वर पोहोचली आहे, मात्र बिबट्यांची उपजीविका ज्या प्राण्यांवर अवलंबून असते त्या नैसर्गिक अधिवासाचे प्रभावीपणे संवर्धन करण्यात येत आहे का, असा प्रश्न शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विचारला होता. त्याला वनमंत्री गणेश नाईक यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर त्यांच्या उपजीविकेसाठी ससे, हरणे अशा प्रजातींच्या प्राण्यांची संख्या पुरेशी आहे. त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात आहे, असे वनमंत्री म्हणाले. बिबट्यांचे रहिवाशांवर होणारे हल्ले आणि त्यावरील उपाययोजनांवर प्रवीण दरेकर, भाई जगताप यांनी प्रश्न विचारत उपाययोजनांची माहिती घेतली.
आदिवासींचे पुनर्वसन आरेमध्ये
उद्यानातील आदिवासींचे पुनर्वसन आरे वसाहतीमधील 90 एकर जागेत केले जाणार असून अपात्रांचे पुनर्वसन ठाण्यात केले जाणार आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली.
बिबट्यांची नसबंदी!
बिबट्यांच्या नसबंदीसाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे त्याचे काय झाले, असा सवाल सत्यजित तांबे यांनी केला. त्यावर केंद्राकडून परवानगी मिळाल्यावर बिबट्यांची नसबंदी केली जाईल, असे आश्वासन नाईक यांनी दिले.