Monsoon Session 2025 – क्रिकेट सट्ट्यातील बब्बर शेर बुकी नागपूरमध्ये, भाजपच्या जोरगेवार यांचा ‘गृह’वर निशाणा

सध्या आयपीएल क्रिकेटचा सट्टा मोठ्या प्रमाणावर आहे आणि दुर्दैवाने क्रिकेट सट्ट्यातील मोठे ‘बब्बर शेर बुकी’ नागपूरमध्ये बसले आहेत. क्रिकेटच्या ऑनलाइन सट्ट्यातून मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होतात, अशा शब्दांत चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी आज मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला

आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिह्यातील घुग्घुस येथील ऑनलाइन क्रिकेट सट्ट्याच्या संदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून क्रिकेटवर सट्टा लावला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कायदा मजबूत करण्यासाठी केंद्राला पत्र

या चर्चेला उत्तर देताना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, वेगवेगळ्या पद्धतीचे अ‍ॅप्स वापरून राज्यात सट्टा खेळला जातो. या अनुषंगाने यासंदर्भात कायदा नाही. ऑनलाइन गेम बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कायदा नसल्याने ऑनलाइन गेमवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कायद्याअंतर्गत राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे की, हा कायदा अधिक मजबूत करण्याची विनंती केली आहे. लवकरात लवकर कायद्यात बदल करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारनेही काही सूचना केल्या आहेत.