
राज्याची महसूल तूट 98 हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. या वर्षी दोन लाखांची तूट राज्याच्या डोक्यावर येण्याची शक्यता आहे. व्याजासाठी राज्याच्या एकूण महसुलापैकी एक तृतीयांश खर्च करते. एक लाख कोटीची महसूल तूट महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्याला भूषणावह नाही. राज्यावर 9 लाख 32 हजार कोटींचे कर्ज झाले असून वाढीव पुरवणी मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली आहे, असा गंभीर आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या पुरवण्या मागण्यांवर केलेल्या भाषणात केला.
राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात 57 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्या विरोधात दानवे यांनी आज विधान परिषदेत विरोधकांची भूमिका मांडली. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्याचबरोबर महाराष्ट्र देशाच्या उत्पन्नात वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून सर्वात जास्त वाटा उचलतो. मात्र केंद्र सरकार राज्याला परतावा देण्याचे प्रमाण खूप कमी असल्याचे दानवे म्हणाले.
कृषी खात्याला पुरवणी मागण्यात फक्त 229 कोटी रुपये मिळाले आहेत. संपूर्ण अर्थसंकल्पाचा विचार केला तर कृषी खात्याला 9 हजार कोटींची तरतूद केली आहे. यातील 5 हजार कोटी रुपये फक्त नमो योजनेला आहेत. कृषी विभाग मोठ्या प्रमाणावर महत्त्वाचा असताना कृषीमंत्री यांनी पाहिजे तेवढ्या निधीची मागणी केली नाही की, मुख्यमंत्र्यांनी दिला नाही, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
निधी नसतानाही कंत्राटे काढली
निधी उपलब्ध नसतानाही कंत्राटे काढली आहेत. कंत्राटदारांची स्थिती दयनीय झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जल जीवन मिशन, आमदार व खासदार निधी थकला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंधारण विभागाअंतर्गत तिजोरी खाली असताना कामे का मंजूर केली, असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.
राज्याचा गाडा दारूच्या महसुलावर
राज्याचा गाडा दारूतून येणाऱ्या महसुलावर सुरू आहे. यामुळे गावोगावी राज्यात भेसळीयुक्त दारूच्या भट्ट्या सुरू आहे. आगामी काळात राज्याचे मंत्रिमंडळातीलच मंत्रीच यात सहभागी होऊन दारूचा पूर आणतील. जनता हिताचे कोणतेही लवलेश या पुरवण्या मागण्यांमध्ये दिसत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.
बाळासाहेबांच्या संकल्पनेवर पैठण येथे विद्यापीठ
संभाजीनगर जिह्यात पैठण येथे संत विद्यापीठ निर्माण केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेवर आधारित हे विद्यापीठ आहे. संत एकनाथ महाराज यांचे हे गाव जन्मस्थान असून 23 कोटी रुपये या विद्यापीठाला देण्यासाठी सरकारकडे निधी नसल्याचे म्हणत आहे, असे दानवे म्हणाले.