Monsoon Session 2025 – ओम फट् स्वाहा…पन्नास खोके, मर्सिडीज ओक्के…कोंबडीचोराचे करायचे काय… विरोधकांच्या घोषणाबाजीने भरत गोगावले, नीलम गोऱ्हे, नितेश राणेंची भंबेरी

पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात आणि सभागृहाबाहेर अशा दोन्ही पातळ्यांवर विरोधी पक्ष सातत्याने सरकारवर हल्ला चढवत आहे. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांना असे काही टोले हाणले की त्यांची पुरती भंबेरी उडाली. ओम फट् स्वाहापासून कोंबडीपर्यंत सर्वच त्यांनी साभिनय बाहेर काढले. विरोधकांच्या त्या मिश्कील हल्ल्यामुळे गोगावले, गोऱ्हे, नितेश राणेंना मान खाली घालून सभागृह गाठावे लागले.

विरोधकांचे आंदोलन सुरू असतानाच अघोरी पूजेच्या व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मिंधे गटाचे भरत गोगावले पायऱ्यांजवळ आले. ते आत जात असतानाच विरोधकांनी ‘ओम फट् स्वाहा…’ अशा घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी तांत्रिकासारखी अ‍ॅक्टिंग करून दाखवताच इतर आमदारांनी पोट धरून हसत त्यांना दाद दिली.

मिंधे गटाच्या विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे आल्या असता… ‘पन्नास खोके, मर्सिडीज ओक्के’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. त्या ऐकून गोऱ्हे थोडा वेळ जागीच थबकल्या. त्यांनी मागे वळून डोळे वटारून विरोधकांकडे विशेषतः शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांच्याकडे क्षणभर पाहिले आणि आत निघून गेल्या.

भाजप आमदार नितेश राणे यांना पाहताच विरोधकांनी ‘कोंबडीचोराचे करायचे काय… खाली डोकं वर पाय’ अशी जोरदार घोषणा करताच नितेश राणे यांनी काढता पाय घेतला. महसूलमंत्री बावनकुळे आंदोलन पाहून थोडा वेळ थांबले. यावेळी राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी ‘बघता काय सामील व्हा…’ अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली.

विधानसभेत विरोधी पक्षनेते पद दिले जात नसल्याबद्दल विरोधकांनी सरकारचा निषेध केला. सरन्यायाधीशांनी आतापर्यंत अनेकांना न्याय दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये स्थापन केलेली शिवसेना आणि 1999 मध्ये शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष दोन वर्षांपूर्वी राजकारणात आलेल्यांच्या नावावर केले. त्याबद्दलही सरन्यायाधीशांनी न्याय द्यावा, असे भास्कर जाधव यावेळी म्हणाले. ‘विरोधी पक्षनेता नसलेल्या सभागृहात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचे स्वागत…’, ‘चीफ जस्टीस न्याय द्या,’ असे फलक यावेळी झळकावण्यात आले.