इंडिगोचे दिल्लीला जाणारे विमान टेकऑफनंतर लगेचच पाटण्याला परतले, पक्ष्याच्या धडकेमुळे इंजिनात बिघाड

बुधवार (9 जुलै ) सकाळी पाटणा विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच आपत्कालीन स्थितीत परतावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार टेक ऑफ दरम्यान विमानाच्या एका इंजिनला पक्षी धडकला होता. त्यामुळे विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. सुरक्षिततेचा विचार करून वैमानिकाने सावधगिरी बाळगून पाटणा विमानतळावर विमान सुरक्षितपणे परत उतरवले. या विमानात एकूण 169 प्रवासी होते.

टाइम्स आॅफ इंडियाच्या वृत्तानुसार पाटणा विमानतळावरून विमानाने सकाळी 8.41 वाजता उड्डाण केले होते. परंतु उड्डाणानंतर लगेचच एका इंजिनमध्ये कंपन जाणवल्यामुळे विमानाला लगेचच पाटणा येथे परतावे लागले. सध्या या विमानाची तांत्रिक तपासणी सुरू आहे आणि प्रवाशांना दिल्लीला नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.

पाटणा विमानतळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पाटणा ते दिल्लीला जाणाऱ्या विमान IGO5009 ने टेक ऑफ नंतर लगेचच पक्ष्याला धडक दिली. धावपट्टीवर तपासणीदरम्यान एका मृत पक्ष्याचे तुकडे आढळले. ही माहिती अ‍ॅप्रोच कंट्रोल युनिटद्वारे विमानाला देण्यात आली.” विमानतळ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “पक्षी आदळल्यानंतर विमानाच्या इंजिनमध्ये कंपन दिसले होते. यावेळी पायलटने प्रसंगावधान राखून विमान लगेच पाटण्याला वळवले आणि धावपट्टी 7 वर सुरक्षितपणे उतरले.”

यापूर्वी मंगळवारी (8 जुलै) सकाळी तांत्रिक बिघाडामुळे इंदूरहून रायपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला उड्डाणानंतर सुमारे 30 मिनिटांनी आपत्कालीन लँडिंग करावे लागले. फ्लाइट क्रमांक 6E- 7295 दररोज सकाळी 6.35 वाजता इंदूरहून निघाले होते.