Wimbledon 2025 – इगा स्विटेक प्रथमच अंतिम फेरीत, आता ऑमिसिमोव्हाशी संघर्ष

अमेरिकेच्या अमांदा ऑमिसिमोव्हाने अव्वल मानांकित एरिना सबालेंकाचा दोन तास 37 मिनिटे चाललेल्या संघर्षात 6-4, 4-6, 6-4 असा पराभव करत प्रथमच विम्बल्डनच्या महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. तसेच पाच ग्रॅण्डस्लॅम जिंकूनही हिरवळीवर अपयशी ठरत असलेल्या पोलंडच्या इगा स्विटेकने स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेंकिकचा 6-2, 6-0 असा फडशा पाडत प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळवले. दोघीही विम्बल्डनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रथमच खेळणार असल्यामुळे यंदा नवी राणी लाभणार असल्याचे निश्चित झाले.

आपल्या नऊ वर्षांच्या टेनिस कारकीर्दीत केवळ दुसऱयांदाच ग्रॅण्डस्लॅमची उपांत्य फेरी खेळणाऱया ऑमिसिमोव्हाने आज खळबळ माजवली. तिने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सबालेंकाला थरारक लढतीत हरवण्याचा करिश्मा दाखवला. सबालेंका गेल्या तिन्ही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत खेळली होती. पण यावेळी तिला हे करता आले नाही. ती गेल्या तीन वर्षांत दोनदा उपांत्य फेरीतच हरली होती आणि आजही तीच पुनरावृत्ती झाली. तिने ऑमिसिमोव्हाला जोरदार टक्कर दिली, पण ती थोडीशी कमी पडली. दुसऱया उपांत्य सामन्यात इगा स्विटेकने बेंकिकचा सव्वा तासातच फडशा पाडत ही पहिल्या फेरीची लढत असल्याचे चित्र उभे केले. चार फ्रेंच आणि एक अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम जिंकणारी स्विटेक विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे कधीच पोहोचली नव्हती. अखेर ती प्रथमच हिरवळीवर जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भिडेल. गेल्या दोन्ही ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्य फेरीतच तिचे स्वप्न भंगले होते. विम्बल्डनच्या निमित्ताने ती पहिल्यांदा बाजी मारेल.