मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सरकारच्या नाकर्तेपणाचे 340 बळी, पाच वर्षात 957 दुर्घटना, अपघाताचे 32 ब्लॅक स्पॉट

फाईल फोटो

केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या पाच वर्षांत तब्बल 340 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या काळात 957 अपघाताच्या घटना घडल्या असून शेकडो प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. रखडलेले चौपदरीकरण, धोकादायक वळणे, खड्ड्यांच्या बजबजपुरीमुळे या मार्गावर अपघाताचे 32 ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत. मात्र ठोस उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आल्याने मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

खारपाडा पूल, आमटेम, रामवाडी जरा जपून

रस्त्याच्या विशिष्ट भागात वारंवार अपघात होत असल्यास किंवा तीन वर्षांत एकाच ठिकाणी पाच-दहा अपघात झाले तर ती जागा अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केली जाते. यानंतर या ठिकाणचे तज्ज्ञ पथक अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर सूचना देऊन ही जागा सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना करतात. मुंबई-गोवा महामार्गावर ३२ अपघातप्रवण क्षेत्र आहेत. यामध्ये खारपाडा पूल, खरोशी फाटा, तरणखोप, रामवाडी, वाशी फाटा, उचेडे, डोलवी, गडब, कासू, आमटेम, पेण फाटा ते अंगार आळी, सुकेळी खिंड, तळवली, पुई, मुगवली, कशेणे, ढालघर, तिलोरे, रेपोली, लोणेरे, टेमपाले, तळेगाव, गोरेगाव, लोणेरे, टेमपाले ते लाखपाले, गांधारपाले, वीर, वीर फाटा, पार्ले या ठिकाणांचा समावेश आहे.

उपाययोजनानंतरही अपघातात वाढ

अपघात रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी दंडात्मक कारवाई केली जाते. ज्या ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र आहे, त्या अगोदरच फलक लावून वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन केले जाते. ठिकठिकाणी वाहतुकीचे दहा सुवर्ण नियम फलकाद्वारे लावून वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांना वाहन सुरक्षित चालविण्याचे संदेश दिले जात आहेत. मात्र त्यानंतरही अपघात वाढतच आहेत.

रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते कशेडी या 154 किलोमीटरदरम्यान मुंबई-गोवा महामार्ग जातो. महामार्गावरून दररोज सुमारे 1 लाख 85 हजार 942 न होते. तसेच पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 14 वर्षांपासून रखडले आहे.

इंदापूर पुढील दुसऱ्या टप्प्याच्या कामाचीही तीच गत आहे. महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पर्यायी मार्ग, पुलांची कामे, संरक्षक फलकांचा अभाव या सर्व बाबींमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसून येते. परिणामी महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.