Mumbai Accident – भरधाव ‘बेस्ट’ बसची उभ्या ट्रकला धडक; चालकासह पाच जण जखमी

मुंबईतील गोरेगाव येथे बेस्ट बसचा शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या बेस्ट बसने रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की बसच्या पुढच्या भागाचा पार चेंदामेंदा झाला असून या अपघातात बस चालकासह पाच जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी वनराई पोलीस चौकीसमोर हा अपघात झाला. वडाळा आगारातील मातेश्वरी कंपनीची भाडेतत्वावरील बेस्ट बस दिंडोशी येथून शिवडी बस स्थानकाकडे मार्गस्थ झाली होती. सकाळी साडे सहाच्या सुमारास बस वनराई पोलीस स्थानकासमोर जात होती. त्याचवेळी बसने उभ्या ट्रकला धडक दिली.

विशेष म्हणजे हा ट्रक पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेला होता आणि तो अपघात झाला त्याच ठिकाणी उभा होता. बेस्ट बसने या ट्रकला धडक दिल्यानंतर वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील कारवाई सुरू केली.

दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळाची स्थिती दाखवणारा एक व्हिडीओ आयएएनएस या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. यात बसच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाल्याचे आणि प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पुढील दरवाजाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. तसेच ट्रकच्या मागील भागाचेही मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर या भागात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.