बेकायदा इमारती जमीनदोस्त केलेल्या खान कंपाऊंडमध्ये हिरवाई बहरणार, 21 बांधकामांच्या जागी 5 एकरमध्ये वृक्षारोपण

न्यायालयाच्या आदेशानंतर मुंब्रा-शिळ भागातील खान कंपाऊंडमधील 21 बेकायदा इमारतींवर अखेर हातोडा टाकण्यात आला आहे. महिनाभरापासून सुरू असलेली ही मोहीम दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाली असून मोकळ्या झालेल्या पाच एकर जागेवर आता हिरवाई बहरणार आहे. महापालिका या सर्व जागेवर वृक्षारोपण करणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील वृक्षांचे रोपण केले गेले आहे. त्यामुळे खान कंपाऊंड भविष्यात हिरवेगार होणार आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने मुंब्रा-शिळ भागातील गट क्रमांक 178, 179 आणि 180, शिळ येथील 17 अनधिकृत इमारतींवर पालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत 13 जून पासून सलग चार दिवस बुलडोझर फिरवण्यात आला. या कारवाईत 12 इमारती भुईसपाट करण्यात आल्या. त्यानंतर चार इमारतींच्या रहिवाशांनी न्यायालयात कारवाईला स्थगिती देण्यासाठी धाव घेतली. मात्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती न देता येथील रहिवाशांना आपले बस्तान हलवण्यासाठी 23 जूनपर्यंत मुदत दिली होती.

ही मुदत संपताच ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने उर्वरित अनधिकृत इमारतींवर कारवाईला सुरुवात केली आहे. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह पालिकेचे पथक आणि पोलीस बळ घेऊन या ठिकाणच्या अनधिकृत इमारतींवर कारवाई केली जात होती. ही कारवाई संपली असून मोकळ्या जागेवर वृक्षारोपणास सुरुवात केली आहे.

वाढीव चार इमारती असल्याचे निष्पन्न

सुरुवातीला खान कंपाऊंडमध्ये 17 इमारती बेकायदा असल्याचे प्रशासनाने सांगितले होते, पण कारवाई सुरू असताना वाढीव चार इमारती असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एकूण 21 इमारतींवर हातोडा टाकण्यात आला. पुन्हा या जागेवर बेकायदा इमले उभे राहू नयेत याकरिता संपूर्ण पाच एकर जागेवर वृक्षारोपण करून जंगल तयार केले जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात पाडण्यात आलेल्या इमारतींच्या जागेवर लागवड योग्य मातीचा भराव करून वृक्षारोपण केले आहे. उर्वरित जागेवरही टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण केले जाणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे.