
काही दिवसांपूर्वी इटालियन फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल इटालियन लेदर फुटवेअर डिझाईन म्हणून विकण्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावरून मोठा वादंग झाला. त्यानंतर प्राडा ब्रॅण्डने या चपला म्हणजे कोल्हापुरी चप्पल असल्याचे मान्य केले. या सर्व वादानंतर आता ‘प्राडा’ कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी पुढील आठवड्यात महाराष्ट्र भेटीवर येणार आहेत. त्यांनी कोल्हापुरी कलेक्शन सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. कोल्हापुरात येऊन कोल्हापुरी चप्पल कशी बनते, याची पाहणी करणार आहेत.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर आणि आंतरराष्ट्रीय लक्झरी फॅशन ब्रँड ‘प्राडा’ ग्रुप यांच्यात शुक्रवारी एक उच्चस्तरीय ऑनलाइन बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी चेंबरचे महाराष्ट्र अध्यक्ष ललित गांधी होते. प्राडाकडून लोरेन्झो बर्टेली, ख्रिस्तोफर बग, रोबर्टो मास्सार्डी, फ्रान्सेस्का सेकंदारी, वॅलेंटिना इस्मे पिकाटो यांनी भाग घेतला. बैठकीत ‘प्राडा’ने कोल्हापूरच्या स्थानिक कारागिरांच्या सहकार्याने मेड इन इंडिया-कोल्हापुरी प्रेरित नवे कलेक्शन लाँच करण्याचा मानस व्यक्त केला. या कलेक्शनमध्ये जीआय टॅगचे पालन केले जाईल. इटलीचे पथक 15 किंवा 16 जुलै रोजी महाराष्ट्रात येणार आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व केले जाईल. याअनुषंगाने प्राडा ग्रुपने त्यांच्या यशस्वी मेड इन मोहिमांची जागतिक उदाहरणे सादर केली. मेड इन पेरु, मेड इन जपान, मेड स्कॉटलँड अशाच पद्धतीने मेड इन इंडिया-कोल्हापुरी कलेक्शनसाठी संकल्पनाही प्राडाच्या अधिकाऱ्यांनी मांडली.
महाराष्ट्र चेंबरने या वेळी पैठणी, हिमरू, बिछवा/पैंजण (नुपूर) व स्थानिक भरतकामासारख्या पारंपरिक हस्तकला प्रकल्पांवर सहकार्य करण्याचा प्रस्ताव मांडला. ‘प्राडा’ ग्रुपने त्यालाही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि भावी संग्रहात समावेश करण्यासाठी या हस्तकलांचा अभ्यास करण्याची तयारी दर्शवली.
प्रशिक्षण व ज्ञानाची देवाणघेवाण
हिंदुस्थान व इटालियन कारागिरांमध्ये प्रशिक्षण, ज्ञान व नवकल्पनांची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी संरचित प्रशिक्षण व क्रॉस-कल्चरल प्रकल्प राबवण्याचीही चर्चा झाली. डिझाइन इनोव्हेशन आणि शाश्वत उत्पादन हे या सहकार्याचे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे.