
मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या शेकडो कंत्राटी सुरक्षा रक्षकांना गेल्या तब्बल तीन महिन्यांपासून पगारच मिळालेला नसल्याने त्यांच्यासमोर उपासमारीचे संकट ओढवले आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने सुरक्षा रक्षकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून त्यांच्यासमोर कुटुंब कसे चालवणार असा प्रश्न पडला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत सुमारे दोन हजार कायम सुरक्षारक्षकांसह इतर तीन ते चार खासगी कंपन्यांची सुरक्षा सेवा घेण्यात आली आहे. या कंत्राटी सुरक्षा कर्मचाऱ्यांना पालिका मुख्यालय, वॉर्ड ऑफिस, विविध विभाग, खाती, स्विमिंग पूल आणि पालिकेच्या कार्यालयांमध्ये ड्युटी करावी लागते. अशाच प्रकारे पालिकेने कंत्राटी तत्त्वावर सेवा घेतलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे या कंपनीकडे काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पालिकेचे नियंत्रण नसल्यानेच कंत्राटदारांची मुजोरी
कंत्राटी तत्त्वावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना आधीच तुटपुंजा पगार दिला जातो. या कर्मचाऱ्यांना सुमारे 15 ते 20 हजारांचा पगार दिला जातो. यामध्ये काही कंत्राटदार पगाराला कात्री लावून कमी रक्कम देत असल्याचा आरोपही काही कंत्राटी कामगार करतात.
त्यामुळे हे सुरक्षा रक्षक नेमणाऱ्या कंत्राटदारांवर पालिका प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण, वचक नसल्याचेही कामगार सांगतात. आता तर मिळणारा तुटपुंजा पगारही मिळत नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पालिकेला आतातरी जाग येणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.