
कांजूरमार्गमधील एका बहुमजली इमारतीला रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमाराला भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात जवानांना यश आले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
कांजूरमधील आर. देशमुख मार्गावरील गांधी मार्केटजवळ असलेल्या एन. जी रॉयल पार्क या 19 मजली इमारतीच्या वायरिंगला आग लागली. ही आग 16 ते 18 व्या मजल्यादरम्यान पसरली. आगीमुळे रहिवाशांनी इमारतीबाहेर पळ काढला तर काही अडकून पडले. घटनेच्या माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. आगीमुळे धूर निर्माण झाल्याने जवानांना आग विझविण्यात अडचणींचा सामना करावा लागला. अग्निशमन दलाच्या 3 फायर इंजिन आणि अन्य उपकरणांच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणली.