बॉलीवूडपेक्षा मराठी चित्रपट भारी; नवाजुद्दीन सिद्दिकी आणि जयदीप अहलावत यांच्याकडून कौतुक

नुकताच मराठी फिल्मफेअर सोहळा पार पडला.  या सोहळ्याला नवाजुद्दीन सिद्दिकी, जयदीप अहलावत, तब्बू, राजकुमार राव आदी बॉलीवूड कलाकार उपस्थित होते. सोहळ्यानंतर नवाजुद्दीन सिद्दिकी आणि जयदीप अहलावत यांनी मराठी चित्रपटांचे भरभरून कौतुक केले. बॉलीवूडपेक्षा मराठी चित्रपट भारी असे त्यांनी म्हटले.

नवाजुद्दीन सिद्दिकी म्हणाला, ‘‘मराठीत कायमच चांगले सिनेमे बनत आले आहेत. मी तर म्हणेन बॉलीवूडपेक्षाही जास्त चांगले सिनेमे आहेत. ‘फँड्री’, ‘कोर्ट’सारखे अनेक असे आयकॉनिक सिनेमे आहेत. मराठीतून नेहमी काही ना काही चांगलंच येतं. याचं कारणही काय तर सगळे थिएटर करून येतात.   मराठीत असे अनेक कलाकार आहेत जे खूप टॅलेंटेड आहेत. ’’

 ‘नटसम्राट’ची भूमिका करायचीय- जयदीप

‘नटसम्राट’ची भूमिका हिंदीत करायची इच्छा जयदीप अहलावत याने  व्यक्त केली. ‘‘मला मराठी सिनेमा खूप आवडतो. मीसुद्धा थिएटर केलं आहे. फिल्म इन्स्टिटय़ूट, पुणे येथे जेव्हा शिकत होतो तेव्हा मला जाणवलं की मराठी थिएटर किती स्ट्राँग आहे.  ‘नटसम्राट’ या सिनेमाचा तर मी  मोठा चाहता आहे. कधीही  मला ‘नटसम्राट’ हिंदीत करायला आवडेल,’’ असे जयदीप  म्हणाला.