
शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून घेतला. सरकारने कायदा मंजूर करून घेतला असला तरी काँग्रेसचा विरोध कायम असून राज्याच्या प्रत्येक जिह्यात या काळ्या कायद्याची होळी केली जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दिली.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गेल्या आठवड्यात जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले. विधानसभेत या विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा दिला तर विधान परिषदेत विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. जनसुरक्षा कायद्यामागचा हेतूच मुळात काळा आहे. या कायद्याचा फायदा फक्त सरकार आणि सरकारधार्जिणे उद्योगपती यांनाच होणार आहे. धारावीचा भूखंड गिळंकृत करणारे, गडचिरोली जिह्यातील सुरजागडचे खनिज संपत्ती लाटणारे आणि शक्तिपीठ मार्गाचा रेड कार्पेट ज्यांना हवा आहे त्या उद्योगपतींना त्याचा फायदा होणार असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारविरोधात बोललात तर कारवाई
जनसुरक्षा कायद्याला विरोध करणारे गडचिरोलीतील पर्यावरणवादी, आदिवासी, धारावीतील लोक, शक्तिपीठाला विरोध करणारे शेतकऱ्यांनी मात्र विरोध केला तर त्यांना तुरुंगात टाकले जाणार आहे, त्यांची संपत्ती जप्त केली जाणार आहे. सरकारचे फक्त कौतुक करा नाहीतर गप्प बसा आणि विरोधात बोलाल तर जनसुरक्षा कायद्याचा बडगा उभारून तुम्हाला गप्प करू हाच यामागचा हेतू असल्याची टीकाही त्यांनी केली.