
राज्याच्या अनेक भागात पाऊस सकिय झाला असून 15 जुलै रोजी मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामध्ये मुंबईसह कोकणाला खबरदारीचा अलर्ट देण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याच्या अंदाजाला हुलकावणी देणाऱ्या पावसामुळे ‘अंदाज पावसाचा वाटे खरा ठरावा!’ अशीच अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार बरसायला सुरूवात केली आहे. मात्र राज्याच्या अनेक भागात पावसाने उसंत घेतल्याने शेतीची कामेही खोळंबली आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्यापासून मुंबईसह कोकणाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
बुधवारपर्यंत सावध रहा
गेल्या आठवड्यापासून तुरळक बरसणारा पाऊस आता चांगलाच सक्रिय होणार असून बुधवार 16 जुलैपर्यंत जोरदार पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुणे, सातारा आणि घाटमाथ्यासह उत्तरेकडील राज्यांनाही हवामान खात्याने जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.