
मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पामध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रकल्पासाठी खासगी वाटाघाटीद्वारे करण्यात येणाऱ्या जमीन खरेदीत शासकीय मूल्याच्या पाचपट रक्कम दिली जाणार आहे. यासाठी सरकारकडे 30 कोटींचा प्रस्तावही सादर करण्यात आल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसृष्टी उभारण्यासाठी महायुती सरकारने 100 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. त्यासाठी 2 एकर 18 गुंठे जमीन संपादित करण्यात येणार असून या जमिनीवर मालवण नगर परिषदेचे आरक्षण आहे. सीआरझेडमध्ये ही जमीन येत आहे. या जमिनीच्या भूसंपादनासाठी भाजप आणि शिंदे गटाचे सत्ताधारी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी संगनमताने 29 कोटी 61 लाख 42 हजार रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला आहे.
एका गुंठ्याला सुमारे 30 लाख 21 हजार रुपये दिली जाणारी रक्कम खरोखरच संबंधित जमीन मालकांना मिळणार आहे का? की सत्ताधारी नेते आणि अधिकारी यांच्यामध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत? त्याचबरोबर मालवण शहरातील इतर आरक्षित जमिनींनादेखील हाच दर महायुती सरकार देणार का?, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला.