Ratnagiri Rain News – संगमेश्वर तालुक्यात पावसाने दाणादाण, रामपेठ बाजारपेठेत पूरस्थिती; कसबा, डिंगणी, संगमेश्वर- देवरुख मार्ग बंद

सोमवारी रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधारेमुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी पार केली आहे. संगमेश्वरमधील शास्त्री नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढल्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ बाजारपेठ पूर्णतः जलमय झाली आहे. पावसाने थैमान घातल्याने विद्यार्थ्यांना आज शाळेत पोहोचणे देखील अवघड झाले.

रामपेठ येथील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळ पाण्याखाली गेले असून व्यापार ठप्प झाला आहे. अनेक दुकाने आणि घरे पाण्यात बुडाल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक आणि ग्राहकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. संगमेश्वरचे पोलीस पाटील कोळवणकर यांनी सांगितले, शास्त्री नदीची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना आपले मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणताही अनर्थ टाळण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. रत्नागिरीच्या अन्य भागांतही पावसाचा जोर कायम असून अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही गावांचा संपर्क तुटला आहे.

रत्नागिरीत पावसाचा जोर कायम; जगबुडी, शास्त्री, कोदवली नद्या इशारा पातळीवर

संगमेश्वर कसबा नायरी मार्गावर कसबा येथे शास्त्री नदीचे पाणी मोरीवर आल्याने संगमेश्वर कसबा नायरी वाहतूक मंद गतीने सुरू होती. न्यू इंग्लिश स्कूल कसबा या शाळेच्या तळघरातील वर्गात पुराचे पाणी शिरल्याने शाळा व्यवस्थापनाची अक्षरशः दाणादाण उडाली. संगमेश्वर-डिंगणी मार्गावरही शास्त्री नदीच्या पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पुराचे पाणी भरल्यामुळे पूर्णतः ठप्प झाली.

संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी

संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी घुसले. सोमवारी रात्री पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शास्त्री आणि सोनवीला मोठ्या प्रमाणात पूर आला. संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी घुसले. पावासाची संततधार सुरूच असल्याने पुराचे पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन संगमेश्वर येथील नदी किनाऱ्यालगतच्या व्यापाऱ्यांनी आपला मान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. तसेच चौपदरीकरण दरम्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने तसेच महामार्गावरील पाण्याचे नियोजन नसल्याने संगमेश्वर परिसरातील वाहतूक संथ गतीने सुरू होती.

Ratnagiri News – चिपळूणात 130 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, लढत रंगतदार होण्याची शक्यता

संगमेश्वर देवरुख मार्ग बंद

संगमेश्वर देवरुख मार्गावर बुरंबी नजीक तीन ठिकाणी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग सकाळी आठ वाजल्यापासून बंद पडला. या मार्गावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद झाल्याने आज अनेकांची मोठी गैरसोय झाली. बुरुंबीनजीक संगमेश्वर देवरुख मार्गाची तीन ठिकाणी उंची वाढवावी अशी मागणी या निमित्ताने वाहन चालक आणि प्रवासी वर्गाने केली आहे.