शरद पवारांच्या पक्षाची धुरा शशिकांत शिंदे यांच्याकडे, प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवड; जयंत पाटलांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार भाकरी फिरवणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. तसेच जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत, अशीही चर्चा होती. आता शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा देण्यात आली आहे. शशिकांत शिंदे यांची निवड एकमताने करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मंगळवारी महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवारांची साथ दिली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांना मोठा अनुभव आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत.

शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबाबत आमदार रोहित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शशिकांत शिंदे लहान वयातच समाजकारण आणि राजकारणात ते सक्रिय आहेत. 1999 साली शशिकांत शिंदे यांनी प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 12,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले. या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता. शशिकांत शिंदे हे दोन पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले असून त्यानंतर दोन पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगावचे आमदारही होते. सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषद आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत.