
देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. घणसोली ते शिळफाटादरम्यान बांधल्या जाणाऱ्या 21 किमी लांबीच्या समुद्राखालील बोगद्याचा पहिला भाग यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. याचदरम्यान जपान सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पात शिंकानसेन ट्रेनचा समावेश करण्यास मंजुरी दिली आहे.
रेल्वे मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. त्यानुसार वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते ठाणे बोगद्याचे बांधकाम सुरू असून त्यातील घणसोली ते शिळफाटा हा पहिला भाग पूर्ण झाला आहे. प्रकल्पांतर्गत 310 किमी लांबीचे व्हायाडक्ट बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. सध्या ट्रक, ओव्हरहेड इलेक्ट्रिकल वायर, स्टेशन व पूल बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रात बांधकामाला गती देण्यात आली आहे.
शिंकानसेन ट्रेनला ग्रीन सिग्नल
जपानी शिंकानसेन तंत्रज्ञानावर चालणारी बुलेट ट्रेन सध्या ई-5 मालिकेतील असून ई-10 ही अद्ययावत ट्रेन मानली जात आहे. हिंदुस्थान आणि जपानमधील धोरणात्मक भागीदारीअंतर्गत जपान सरकारने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ई-10 शिंकानसेन ट्रेनचा समावेश करण्यास सहमती दर्शविली आहे, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे ई-10 शिंकानसेन ट्रेन हिंदुस्थान आणि जपानमध्ये एकाच वेळी सुरू केल्या जाणार आहेत.